मुंबई : विरुद्ध दिशेने वाहन चालवून वाहतूक नियमांचे उल्लघंन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेऊन गुरुवारी दिवसभरात १०४ वाहनचालकाचे परवाने रद्द केले, तर दोषी वाहनचालकाविरुद्ध ११ लाख ५७ हजार ५०० रुपयांचा दंड वसुल केला आहे. शहरातील वाढत्या रस्ते अपघाताच्या घटनांसह वाहनचालकांना शिस्त लागावी म्हणून वाहतूक पोलिसांनी गुरुवारी एका विशेष मोहिमेअंतर्गतविरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या चालकाविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. यापूर्वी अशाच प्रकारे एप्रिल महिन्यांत ही मोहीम राबविण्यात आली होती. गुरुवारी एकाच दिवशी वाहतूक पोलिसांनी २ हजार ७१३ चालकाविरुद्ध कारवाई केली. त्यात एक हजार सहाशे तेवीस चालकाकडून पेंडिग असलेले चलन वसुल करण्यात आले. ३०५ वाहनचालकाचे परवाने जप्त करून १०४ चालकाचे परवाने रद्द करण्यात आले होते. या कारवाईत पोलिसांनी ४७ वाहने जप्त केले आहेत. त्यांच्याकडून सुमारे साडेअकरा लाखांचा दंड वसुल करण्यात आला आहे. विरुद्ध दिशेने वाहन चालवून चालक स्वत:सह दुसऱ्यांच्या जिवाशी खेळत असल्याने ही कारवाई सुरू करण्यात आली होती. याप्रकरणी भादवी कलमांतर्गत ३६, तर एलएसी कलमांतर्गत ३४९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.