मुंबईत नवमतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम, मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्याचे आवाहन

आगामी लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधी प्रत्येक मुंबईकरांचा मताधिकार निश्चित व्हावा या हेतूने, मुंबई शहर आणि उपनगर या जिल्ह्यांमध्ये नवमतदार नोंदणी विशेष मोहीम
मुंबईत नवमतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम, मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्याचे आवाहन

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधी प्रत्येक मुंबईकरांचा मताधिकार निश्चित व्हावा या हेतूने, मुंबई शहर आणि उपनगर या जिल्ह्यांमध्ये नवमतदार नोंदणी विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेला अधिक गती देण्यासाठी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्तपणे विशेष मोहिम राबवली जाणार आहे. नवमतदारांनी यादीमध्ये नाव नोंदवा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवमतदार नोंदणी प्रक्रियेला वेग देण्यासाठी विशेष मोहिम राबवली जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, बेस्टचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, स्वीप नोडल ऑफिसर फरोग मुकादम, विशेष कार्य अधिकारी डॉ. सुभाष दळवी, मुख्य निवडणूक कार्यालय स्वीप समन्वयक, पल्लवी जाधव, मुंबई महानगरपालिकेचे सर्व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक झाली. या बैठकीत १८ वर्षावरील नागरीकांसाठी मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबवणे, दिव्यांग मतदार पर्यंत पोहोचण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे असलेल्या उपलब्ध माहितीच्या आधारे या मतदारांपर्यंत पोहचणे, अंथरुणावर खिळून असलेल्या नागरिकांची आरोग्य विभागाकडील उपलब्ध माहिती तपासून मतदार यादीतील नावांची खात्री करून घेणे, मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी महिला विद्यापीठ, आरोग्य विद्यापीठ आणि होमी भाभा स्टेट विद्यापीठ, यांच्यासह मुंबई शहर आणि उपनगर भागातील खाजगी विद्यापीठांच्या कुलगुरुंशी समन्वय साधून नवमतदारांच्या नोंदणी वाढविण्यासाठी विशेष नियोजन करणे आदींबाबत चर्चा करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संलग्न आरोग्य सेविका, आशा सेविका, महिला स्वयंसहाय्यता गट, महिला बचत गट, स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान वस्ती पातळीवरील कार्यरत संस्था व त्यांचे स्वयंसेवक तसेच नागरी सुविधा केंद्रांच्या माध्यमातून नवमतदार नोदणी विशेष मोहिमेत मुंबई महानगरपालिका सहकार्य करेल असे आश्वासन मुंबई महानगरपालिके आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी बैठकीत दिले. संबंधितांनी निवडणुकीच्या कामाला अधिक प्राधान्य द्यावे, असे निर्देशही बैठकीत देण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in