संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

Mumbai : सोमवारी विशेष सभेचे आयोजन; स्थायी, शिक्षण, सुधार समिती सदस्यांची निवड होणार

महापौर व उपमहापौर यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर विशेष समिती व वैधानिक समिती सदस्य निवडीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. सोमवार, १६ फेब्रुवारी रोजी पालिका मुख्यालयात दुपारी २.३० वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
Published on

मुंबई : महापौर व उपमहापौर यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर विशेष समिती व वैधानिक समिती सदस्य निवडीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. सोमवार, १६ फेब्रुवारी रोजी पालिका मुख्यालयात दुपारी २.३० वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत स्थायी समिती, सुधार समिती, बेस्ट समितीवर सदस्यांची निवड जाहीर करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेचा कारभार हा महापालिका आयुक्त (प्रशासन), महापौर, विविध समित्यांचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून चालतो. महापौर व उपमहापौर नावाची घोषणा झाली असून सदस्य निवड जाहीर करण्यात येणार आहे.

१६ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजता आयोजित महापालिका सभेत, स्थायी समिति व सुधार समिति यांवर प्रत्येकी २६ सदस्यांची, शिक्षण समितीवर २२ महापालिका सदस्यांची आणि ४ बिगर पालिका सदस्यांची तसेच, 'बेस्ट' समितीवर १६ सदस्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यानंतर १८ फेब्रुवारी रोजी आयोजित महापालिका सभेत महापौर या, विविध पक्षांच्या गटनेत्यांची घोषणा करतील. तसेच स्थायी समिती, सुधार समिती, शिक्षण समिती आणि 'बेस्ट' समिति ह्या समित्यांच्या 'अध्यक्ष' पदासाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा कार्यक्रम जाहीर करतील.

२० फेब्रुवारीला स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी निवडणूक

२० फेब्रुवारीला शिक्षण समिति व स्थायी समिति या समित्यांच्या अध्यक्ष पदांसाठी निवडणूक होणार आहे. तसेच २३ फेब्रुवारी रोजी सुधार समिती व 'बेस्ट' समिती या समित्यांच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपकडून ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

प्रभाग समिती अध्यक्षांची निवडणूक

५ मार्च, ६ मार्च आणि ९ मार्च या कालावधीत महापौर, उपमहापौर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महापालिकेच्या १७ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी निवडणुका होणार आहेत.

पुढील ५ वर्षे जमलेला कचरा साफ करायचा!

महापौर व उपमहापौर यांच्या नावाची घोषणा बुधवारी सभागृहात करण्यात आली. मात्र त्यावेळी ठाकरे सेनेच्या नगरसेवकांनी सभागृहात गोंधळ घातला आणि सभागृहात अपुरी जागा शून्य नियोजन अशी टीका केली होती. २०२२ मध्ये नगरसेवकांची संख्या २२७ वरून २३६ करण्याचा घाट कोणी घातला होता. गेली २५ वर्षे मुंबई महापालिकेत सत्तेचा उपभोग घेतला. त्यावेळी दूरदृष्टी ठेवून सभागृह वाढीबाबत का नाही निर्णय घेतला, असा उपरोधिक टोला भाजपचे गटनेते गणेश खणकर यांनी ठाकरे सेनेला लगावला.

logo
marathi.freepressjournal.in