‘विशेष मिशन इंद्रधनुष्य' लसीकरण यशस्वी ; तीन फेरीत १०० टक्के टार्गेट

या तिन्ही फेऱ्यात ३३ हजार ७७५ बालक आणि गरोदर मातांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली
‘विशेष मिशन इंद्रधनुष्य' लसीकरण यशस्वी ;
तीन फेरीत १०० टक्के टार्गेट

मुंबई : गोवर, रुबेलावर मात करण्यासाठी मुंबई महापालिकेने ‘विशेष मिशन इंद्रधनुष्य’ ५.० मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यात एकूण तीन फेऱ्या झाल्या. या तिन्ही फेऱ्यात ३३ हजार ७७५ बालक आणि गरोदर मातांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली.

डिसेंबर २०२३ पर्यंत गोवर, रुबेलावर मात करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ‘विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.०’ मोहीम यशस्वी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्या निर्देशनानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शहर कृती दल व मुंबईतील सात अतिजोखीमग्रस्त विभागांची बैठक पार पडली होती. तसेच २४ प्रशासकीय विभाग स्तरावर विभाग कृती दलाची बैठक पार पडली.

गोवर, रुबेलावर मात करण्यासाठी बालक व गरोदर मातांचे लसीकरण करण्यावर भर दिला असून पहिल्या फेरीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत ० ते ५ वयोगटातील २,६३८ मुलांचे व ३०४ गरोदर मातांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी २,८०६ बालकांचे व २९६ गरोदर मातांचे लसीकरण करण्यात आले आहे. या मोहिमेत अंगणवाडी सेविकांचा तसेच इंडियन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिशिअनचा सहभाग होता. यापुढेही विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहीम सुरु राहिल, असे ही त्या म्हणाल्या. दरम्यान, पहिल्या फेरीत अल्प प्रतिसाद मिळाला, परंतु दोन फेऱ्यात लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

असे झाले लसीकरण!

पहिली फेरी ७ ते १२ ऑगस्ट

पहिल्या फेरीत ३,१०२ बालक व गरोदर मातांचे लसीकरण, यात २,८०६ बालके तर २९६ गरोदर मातांचे लसीकरण,

दुसरी फेरी ११ ते १६ सप्टेंबर

दुसऱ्या फेरीत १५,५२२ बालक व गरोदर मातांचे लसीकरण, यात ० ते ५ वयोगटातील १४,२४१ बालक तर १,२८१ गरोदर मातांचे लसीकरण १,६०१ कॅम्प मध्ये झाले

तिसरी फेरी ९ ते १४ ऑक्टोबर

तिसऱ्या फेरीत १५,१५१ बालक व गरोदर मातांचे, यात १३,९०३ बालक तर १,२४८ गरोदर मातांचे लसीकरण १,५८३ कॅम्प मध्ये झाले.

logo
marathi.freepressjournal.in