मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रात 'मंकीपॉक्स' आजाराचा सध्या एकही रुग्ण नाही. मात्र सरकारच्या निर्देशानुसार खबरदाराचा उपाय म्हणून सेव्हन हिल्स रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग मंकीपॉक्सबाबत आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आरोग्य माहिती कक्षासोबत समन्वय साधत आहे. सेव्हन हिल्समधील विशेष कक्षात १४ खाटांची सोय करण्यात आली आहे. गरजेनुसार खाटांची संख्या वाढवण्याची तयारी रुग्णालय प्रशासनाने ठेवली आहे.
पाकिस्तान आणि स्वीडन या देशात ‘मंकीपॉक्स’ या संसर्गजन्य आजाराने बाधित रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. मुंबई महानगरात विदेशातून येणाऱ्यांची संख्या लक्षात घेता अधिक सावधगिरी बाळगण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ‘मंकीपॉक्स’ संसर्गाचा अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असेही आवाहन करण्यात येत आहे.
विमानतळ - पालिका यांच्यात समन्वय बैठक
परदेशातून येणाऱ्या पर्यटकांच्या अनुषंगाने विमानतळ प्राधिकरणासोबत नियमितपणे समन्वय आणि संपर्क साधण्याच्या सूचना महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिल्या आहेत. या अनुषंगाने ‘मंकीपॉक्स’ संदर्भात बुधवारी, २१ ऑगस्टला विमानतळ आरोग्य अधिकारी, इमिग्रेशन अधिकारी, कार्यकारी आरोग्य अधिकारी यांची एकत्रित समन्वय बैठक झाली.
प्रवाशांची तपासणी
विमानतळ आरोग्य अधिकारी विभागामार्फत ‘मंकीपॉक्स’ बाधित आफ्रिकन देशातून येणारे नागरिक तसेच इतर प्रवाशांची तपासणी (स्क्रीनिंग) करण्यात येत आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (मुंबई) येथे विमानतळ आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत आरोग्य माहिती कक्ष उपलब्ध करण्यात आले आहेत.