पश्चिम रेल्वे लोकलवर वेग मर्यादा गोखले पुलावर १३०० टन वजनाचे गर्डर लॉंच ;पुढील २० दिवस लोकलचा वक्तशीरपणावर लेटमार्क

अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले रेल्वे उड्डाण पूल प्रकल्पातील महत्वाचा टप्पा असलेल्या पहिला गर्डर स्थापित करण्याचे काम हे शनिवारी रात्री ते रविवारी पहाटेपर्यंत पार पडले.
पश्चिम रेल्वे लोकलवर वेग मर्यादा गोखले पुलावर १३०० टन वजनाचे गर्डर लॉंच ;पुढील २० दिवस लोकलचा वक्तशीरपणावर लेटमार्क

मुंबई : अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलावर १२७५ टन वजनाचे गर्डर शनिवारी रात्री लॉंच करण्यात आला. गर्डर लॉंच केल्यानंतर खालून जलदगतीने लोकल गेली तर तो व्हॅबरेट होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे गर्डर लॉंच केल्यानंतर तो जागेवर फिट बसत नाही तोपर्यंत खबरदारी म्हणून पश्चिम रेल्वे प्रशासनाला लोकलची वेग मर्यादा पुढील २० ते २५ दिवस कमी असेल अशी माहिती एबी इन्फ्राबिल्ट लिमिटेड कंपनीचे एमडी अमित मिश्रा यांनी सांगितले. दरम्यान, गोखले पुलावर १२७५ टन वजनाचा पहिला गर्डर शनिवारी रात्री यशस्वीरीत्या लॉंच करण्यात आल्याचे ते म्हणाले.

देशातील विविध रेल्वे हद्दीत ३५० हून अधिक गर्डर लॉंच केले आहेत. मुंबईत ही विद्याविहार, डहाणू या रेल्वे हद्दीत गर्डर केले आहेत. परंतु अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाच्या कामात ७.५ मीटर उंचीवरून सुमारे १३०० टन वजनी गर्डर खाली उतरवणे हा भारतातला पहिलाच प्रकल्प आहे. गोखले पुलावर गर्डर लॉंच करण्यात आला असून, तो जागेवर फिट बसणे गरजेचे आहे. गर्डर लॉंच केल्यानंतर पुलाखालून जलदगतीने लोकल गेली तर गर्डर व्हॅबरेट होऊन धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पश्चिम रेल्वे प्रशासनाला लोकलच्या वेग मर्यादा घालण्यास सांगितले होते. पश्चिम रेल्वेने पुलाखालून जाणाऱ्या लोकलची वेग मर्यादा ५० केल्याचे ते म्हणाले.

अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले रेल्वे उड्डाण पूल प्रकल्पातील महत्वाचा टप्पा असलेल्या पहिला गर्डर स्थापित करण्याचे काम हे शनिवारी रात्री ते रविवारी पहाटेपर्यंत पार पडले. त्यावेळी गर्डर स्थापन करण्याचा शुभारंभ आमदार साटम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदार ऋतुजा लटके, पालिकेचे उप आयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (पूल) विवेक कल्याणकर तसेच पश्चिम रेल्वेचे अधिकारी, मे. राईट्स लि. व कंत्राटदार ए. बी. इन्फ्राबिल्ट यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया

महानगरपालिकेच्या इतिहासात सर्वाधिक वेगाने तयार करण्यात आलेला पूल म्हणजे गोखले पुलाचा प्रकल्प आहे. त्याचा पहिला गर्डर स्थापन करून, येत्या १५ दिवसात या पुलाची तांत्रिकदृष्ट्या सर्वाधिक आव्हानात्मक कामे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत गोखले पुलाची एक मार्गिका खुली करणे शक्य होईल.

-अमीत साटम, आमदार

येत्या काही दिवसात हा गर्डर उत्तर दिशेला सरकवून त्यानंतर टप्प्याटप्प्याने खाली आणण्यात येईल. हे काम तांत्रिकदृष्ट्या अतिशय आव्हानात्मक असणार आहे. त्यासाठी विशेष तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात येईल, नियोजित उंचीवर खाली आणल्यानंतर मार्गिकेची पुढील कामे पूर्ण केली जातील.

उल्हास महाले, पालिका उपआयुक्त (पायाभूत सुविधा)

एखाद्या पुलाच्या कामात ७.५ मीटर उंचीवरून गर्डर विशिष्ट उंचीपर्यंत खाली आणणे, असा हा भारतातील पहिलाच प्रकल्प आहे. मुंबईची लाईफ लाईन असलेल्या रेल्वे परिसरातील भागात हा प्रकल्प राबविण्यात येत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने सर्वतोपरी काळजी घेतली.

विवेक कल्याणकर, प्रमुख अभियंता (पूल)

जुना गर्डर हटवणे चॅलेंज

गोखले पुलावर १२७५ टन वजनाचे गर्डर लॉंच करण्याआधी तात्पुरते वेगवेगळ्या वजनाचे गर्डर लॉंच करण्यात आले आहेत. आता १२७५ टन वजनाचे गर्डर लॉंच केल्याने जुने गर्डर काढण्यात येणार आहेत. जुन्या गर्डर मध्ये २६ टन वजनाचे गर्डर आहे. जुने गर्डर काढताना मेगा ब्लॉक घेण्यात येईल. तसेच ओव्हरहेड वायर वीजेचे खांब याची काळजी घेत बाजूने सरकवत जुने गर्डर काढण्यात येतील, अशी माहिती अमित मिश्रा यांनी दिली.

११ दिवसांचा ब्लॉक !

रेल्वे परिसरातील ७.५ मीटर उंचीवरून पूल खाली आणण्यासाठी पश्चिम रेल्वेने ११ दिवसांचा ब्लॉकचा कालावधी मंजूर केला आहे. पश्चिम रेल्वेच्या विशेष ब्लॉक कालावधीत दररोज रात्रीच्या वेळेतील तीन तासांत सरासरी ५५० मिमी इतक्या प्रमाणात गर्डर खाली आणणे शक्य होईल.

वेग मर्यादा कमी करण्याची सूचना नाही

गोखले पुलावर गर्डर लाॅच केल्यानंतर लोकलची वेग मर्यादा कमी करण्याबाबत कोणाकडून सूचना प्राप्त झालेली नाही, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले.

'असा' आहे पूल

पुलाची लांबी– रेल्वे भूभागात– ९० मीटर

रेल्वेबाहेर– पूर्वेस २१० मीटर, पश्चिमेस– १८५ मीटर

पुलाची रुंदी– (रेल्वे भूभागात)– १३.५ मीटर

रेल्वेच्या पूर्वेस व पश्चिमेस पोहोच रस्ते, पदपथासह- १२ मीटर (दोन्ही बाजूस)

एकूण रुंदी– २४ मीटर

logo
marathi.freepressjournal.in