मुंबई : मुंबईतील वाढते अपघात लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी शहरातील नऊ रस्त्यांवर वेगमर्यादा लागू केली आहे. हे आदेश बुधवारपासून लागू झाले असून त्याची अधिसूचना जारी केली आहे.
शहरात वेगाने गाड्या चालवण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यातून अनेक अपघात झाले आहेत. परिणामी अनेक जण मृत तर काही जणांना अपंगत्व येते. त्यामुळे नवीन नियम सर्व वाहनांना लागू केले आहेत.
पी. डी. डिमेलो रोड, गोदरेज जंक्शन ते ऑपेरा हाऊस, हाजी अली जंक्शन ते महालक्ष्मी रेल्वे स्टेशन दरम्यान ताशी ५० किमी वाहनांचा वेग ठेवला जाईल. वरळीतील खान अब्दुल गफार खान रोड ते बिंदूमाधव चौक ते डॉ. केशवराव हेडगेवार चौक मार्गावर ताशी ६० किमी वेग असेल.
बीकेसीत डायमंड जंक्शन ते एमटीएनएल जंक्शन दरम्यान ताशी ६० किमी वेग असेल. तसेच जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्त्यावर ७० किमीचा वेग निश्चीत केला आहे. जेव्हीएलआर येथील वळण, ब्रीजवरील उतार येथे ३० किमी ताशी वेग निश्चीत केला.
चेंबूरच्या वीर जिजामाता भोसले फ्लायओव्हरवर ताशी ६० किमी वेग निश्चीत केला. छेडा नगर येथील उड्डाणपुलावर ताशी ६० किमी वेग ठेवायचा आहे. अमर महाल जंक्शन येथे ताशी ७० किमी वेग निश्चीत केला. तर पुलाच्या चढ व उतारावर गाड्यांचा वेग ताशी ३० किमी असेल.