अंधेरीतील गोखले पुलाच्या कामाला वेग; जून अखेरपर्यंत दुसरी म्हणजेच उत्तर बाजूची लेन सुरू

अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणारा गोपाळ कृष्ण गोखले हा रेल्वे उड्डाणपुलावरील पादचारी पुलाचा काही भाग ३ जुलै २०१८ रोजी कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. त्या आधीच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला होता.
अंधेरीतील गोखले पुलाच्या कामाला वेग; जून अखेरपर्यंत दुसरी म्हणजेच उत्तर बाजूची लेन सुरू

मुंबई : अंधेरीतील गोखले पुलाच्या कामाला आता वेग येणार आहे. दुसऱ्या गर्डरच्या ३२ भागांपैकी ५ भाग मुंबईत पोहोचले आहेत. उर्वरित सर्व भाग येत्या २० ते २२ एप्रिलपर्यंत येणार असून, दुसऱ्या बाजूचा गर्डर मे अखेरपर्यंत बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे उत्तर बाजूची लेन जून अखेरपर्यंत प्रवासी सेवेत येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, २६ फेब्रुवारीपासून गोखले पुलाची एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.

अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणारा गोपाळ कृष्ण गोखले हा रेल्वे उड्डाणपुलावरील पादचारी पुलाचा काही भाग ३ जुलै २०१८ रोजी कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. त्या आधीच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पालिकेने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये अंधेरी येथील गोखले पूल धोकादायक अवस्थेत असल्याचे समोर आले. पूल धोकादायक असल्याने ७ नोव्हेंबर २०२२ पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. तांत्रिक सल्लागारांची नियुक्ती करून या उड्डाणपुलांची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या पुलाच्या दुसऱ्या बाजूच्या गर्डरचे काही भाग मुंबईत दाखल झाले आहेत. पंजाब, हरयाणा, अंबाला येथील कारखान्यात गर्डरचे भाग तयार करण्यात आले आहेत. शेतकरी आंदोलनामुळे गर्डरचे सुटे भाग मुंबईत येण्यास उशीर झाला. आता दुसऱ्या बाजूच्या गर्डरचे सुट्टे भाग मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे गोखले पुलाच्या कामाला वेग येईल, असा विश्वास मुंबई पालिकेच्या पूल विभागाकडून व्यक्त करण्यात आला.

गर्डरचे एकूण ३२ भाग असून त्यापैकी ५ भाग गेल्या गुरुवारी मुंबईत आले आहेत. उर्वरित २७ भाग पुढील पंधरा ते वीस दिवसांत टप्प्याटप्प्याने मुंबईत दाखल होणार आहेत. पुलाच्या जागेवर या सुट्या भागांची जोडणी करून गर्डर बनवून तो पुलावर बसविण्यात येणार आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या पूल विभागाकडून देण्यात आली.

  • पुलाची लांबी - रेल्वे भूभागात – ९० मीटर

  • रेल्वेबाहेर - पूर्वेस २१० मीटर,

  • पश्चिमेस - १८५ मीटर

  • पुलाची रुंदी - (रेल्वे भूभागात)- १३.५ मीटर

  • रेल्वेच्या पूर्वेस व पश्चिमेस पोहोच रस्ते, पदपथासह - १२ मीटर (दोन्ही बाजूस)

  • एकूण रुंदी - २४ मीटर

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in