

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फनेल झोनमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाचे बदल केले आहेत. या फनेल झोनमध्ये सांताक्रूझ, विलेपार्ले, कुर्ला येथील इमारतींचा समावेश आहे. या इमारतींच्या पुनर्विकासाला संबंधित यंत्रणांनी गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे दिले. यासोबतच जुहू येथील मिलिटरी ट्रान्समिशन स्टेशन निर्बंधाने बाधित असलेल्या इमारतींचाही पुनर्विकास कार्यवाहीला वेग द्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
विमानतळ फनेल झोन आणि जुहू मिलिटरी ट्रान्समीटर स्टेशन निर्बंध बाधित इमारतींबाबत आज विधान भवनात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना फडणवीस म्हणाले, फनेल क्षेत्रातील निर्बंध बाधित इमारतींच्या संदर्भात चटई निर्देशांक (एफएसआय) चे 'पोटेन्शिअल' कुठे द्यायचा आहे, याबाबत महापालिकेने निर्णय घ्यावा. देण्यात येणारा चटई निर्देशांक कुठे वापरायचा आहे, याबाबत ठरविण्यात यावे. बाधित इमारतींच्या पुनर्विकासासाठी रस्त्याच्या रुंदीनुसार उच्चस्तरीय 'पोटेन्शिअल' असणारा चटई निर्देशांक देण्यात यावा.
मुंबईत झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण, म्हाडा, सिडको अशा विविध यंत्रणांच्या माध्यमातून गृहनिर्माणाचे कार्य होत असते. या संपूर्ण यंत्रणांचे नियमन आणि नियंत्रण नगरविकास विभागाने करावे. फनेल झोन निर्बंध बाधित इमारतींच्या पुनर्विकासाबाबत महापालिकेने ‘मॅपिंग’ करावे. जुहू येथील मिलिटरी ट्रान्समिशन निर्बंध असलेल्या इमारतींची पुनर्विकास कार्यवाही गतीने पूर्ण करावी.