गणेशोत्सवापूर्वी नमुंमपा क्षेत्रात रस्ते सुधारणा कामांना वेग; ९५ टक्के रस्ते खड्डेमुक्त

गणेशोत्सवापूर्वी नमुंमपा क्षेत्रात रस्ते सुधारणा कामांना वेग; ९५ टक्के रस्ते खड्डेमुक्त

श्री गणरायाच्या आगमनापूर्वी नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील पावसाळी कालावधीत पडलेले खड्डे दुरुस्त करून बाप्पाचे आगमन निर्विघ्नपणे पार पाडण्याकरिता सर्व विभागातील रस्ते सुधारण्याचे काम शहर अभियंता विभागाने युद्धपातळीवर हाती घेतले आहे.
Published on

नवी मुंबई : श्री गणरायाच्या आगमनापूर्वी नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील पावसाळी कालावधीत पडलेले खड्डे दुरुस्त करून बाप्पाचे आगमन निर्विघ्नपणे पार पाडण्याकरिता सर्व विभागातील रस्ते सुधारण्याचे काम शहर अभियंता विभागाने युद्धपातळीवर हाती घेतले आहे. महापालिका क्षेत्रातील सर्व विभागांमधील मुख्य रस्ते तसेच अंतर्गत रस्तेही ९५ टक्के खड्डेमुक्त करण्यात आले आहेत. उर्वरित पाच टक्के रस्तेही खड्डेमुक्त करण्याचे काम दिवस-रात्र सुरू आहे.

नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्या मार्गदर्शनानुसार, कार्यकारी अभियंत्यांसह सर्व अभियंते रस्ते सुधारणा काम सुरू असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून या कामावर लक्ष ठेवून आहेत.

ही दुरुस्ती करताना शास्त्रीय पद्धतीने खड्ड्यांच्या आकारमानानुसार अतिशय छोट्या खड्ड्यांसाठी कोल्ड मिक्स तसेच मोठा पॅच असल्यास त्याच्या दुरुस्तीसाठी डांबरीकरण किंवा मास्टिकचा वापर केला जात आहे. त्याचप्रमाणे काही मोठ्या आकाराच्या खड्डे दुरुस्तीसाठी काँक्रीट मिक्स अथवा इंटरलॉकचाही वापर केला जात आहे.

खड्डे दुरुस्ती करताना रस्त्याची पातळी व खड्ड्यामध्ये भरलेल्या मटेरियलची पातळी समान राहील याकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे. खड्डे दुरुस्ती केलेल्या जागेवर पुन्हा खड्डा पडणार नाही अशा प्रकारे दुरुस्ती करण्याची काटेकोर काळजी घेण्याचे निर्देश शहर अभियंता आरदवाड यांच्यामार्फत देण्यात आले असून त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in