रेबिजमुक्त मुंबई मोहिमेला वेग! भटक्या कुत्र्यांना वर्षांला बुस्टर डोस

१५ दिवसांत १४ हजार भटक्या प्राण्यांचे लसीकरण
रेबिजमुक्त मुंबई मोहिमेला वेग! भटक्या कुत्र्यांना वर्षांला बुस्टर डोस

मुंबई : रेबिज या आजारावर वेळीच उपचार न झाल्यास, मनुष्याच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे रेबिजमुक्त मुंबईसाठी मुंबई महापालिकेने विशेष मोहिम राबवली. या मोहिमेत २९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरदरम्यान पालिकेच्या सहा वॉर्डात ९ हजार ४९३ भटके कुत्रे तसेच ४ हजार ६९८ भटक्या मांजरांचे लसीकरण करण्यात आले. मात्र भटके कुत्रे रेबिजमुक्त करण्यासाठी दरवर्षी रेबिजचा बुस्टर डोस देण्यात येणार आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग तसेच मत्स्यपालन आणि पशूसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने वर्ष २०३० पर्यंत भटके प्राणी विशेषत: श्वानांपासून होणाऱ्या रेबिज रोगाच्या निर्मूलनासाठी राष्ट्रीय कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली ‘रेबिजमुक्त मुंबई’ करण्याच्या उद्देशाने ‘मिशन रेबिज’ तसेच ‘वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस’ (डब्ल्यूव्हीएस) या संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी दोन्ही संस्था नि:शुल्क सेवा देणार आहेत.

२९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत दररोज सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत रेबिज लसीकरण मोहिम राबविण्यात आली. लसीकरण मोहिमेसाठी एकूण १५ पथके तैनात करण्यात आली होती. त्यात हाताने प्राणी पकडणाऱ्या १० पथकांचा तर जाळीने प्राणी पकडणाऱ्या ५ पथकांचा अंतर्भाव होता. या प्रत्येक पथकात एक लसटोचक, एक माहिती संकलक आणि पशूकल्याण संस्थेचा एक प्राणी हाताळणीस स्वयंसेवक यांचा समावेश होता.

या मोहिमेत मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मिशन रेबिज, वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस, मुंबई ॲॅनिमल असोसिएशन, बाई साकरबाई दिनशॉ पेटिट पशुवैद्यकीय रुग्णालय, अहिंसा, जीव दया अभियान, इन डिफेन्स ऑफ ॲॅनिमल, यूथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ ॲॅनिमल, उत्कर्ष ग्लोबल फाऊंडेशन, ॲॅनिमल मॅटर्स टू मी, जीवरक्षा ॲॅनिमल वेल्फेअर ट्रस्ट, जेनिस स्मिथ ट्रस्ट आणि युनिव्हर्सल ॲॅनिमल वेल्फेअर सोसायटी या संस्थादेखील सहभागी झाल्याचे देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी सांगितले.

या भागात मोहीम सुरू

आर. उत्तर, आर. मध्य, आर. दक्षिण, पी. उत्तर, एस. आणि टी. वॉर्ड

नोंदणी करा, परवाना घ्या!

मुंबईकरांकडे असलेल्या पाळीव श्वानाचे रेबिज प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे. तसेच पाळीव श्वानाची नोंदणी केली नसेल तर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर भेट देऊन नोंदणी करून पाळीव श्वान परवाना प्राप्त करावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

२०२४ मध्ये १ लाख भटक्यांचे टार्गेट

दर १० वर्षांनी श्वानगणना होते. त्यानुसार जानेवारी २०२४ मध्ये मुंबईतील भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्या सर्वेक्षणाच्या आधारे फेब्रुवारी २०२४ मध्ये व्यापक स्तरावर रेबिज लसीकरणाची मोहीम प्रस्तावित आहे. या मोहिमेअंतर्गत केवळ १० दिवसांच्या कालावधीत सुमारे १ लाख भटक्या कुत्र्यांना रेबिज प्रतिबंधक लस देण्याचे नियोजन आहे.

आजाराला १०० टक्के प्रतिबंध करणे उद्देश!

या मोहिमेअंतर्गत रेबिज आजाराचे १०० टक्के प्रतिबंध करणे आहे. या मोहिमेत मुंबई महापालिका हद्दीतील प्राणीप्रेमी, नागरिक, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राणी कल्याण संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे

समज

सर्व श्वान आणि मांजरींना रेबिज असतो.

प्रौढ श्वान किंवा मांजरींपेक्षा श्वानांच्या व मांजरींच्या पिल्लांना रेबिज होण्याची शक्यता जास्त असते.

रेबीज टाळता येत नाही.

पारंपारिक उपचार केल्याने श्वान चाव्यावर उपचार होऊ शकतात.

तथ्य

श्वान आणि मांजरी नैसर्गिकरित्या रेबिजसह जन्माला येत नाहीत. हा एक विषाणूजन्य रोग आहे, जो विषाणूने भरलेल्या लाळेच्या उतींमध्ये प्रवेश करून पसरतो, सामान्यतः रेबीज ग्रस्त जनावरांच्या चाव्याद्वारे.

लसीकरणाद्वारे श्वान व मांजरांमध्ये रेबिज अत्यंत प्रभावीपणे प्रतिबंधित करता येतो.

श्वान/मांजर चावल्यास जखम ताबडतोब आणि पूर्णपणे धुणे आणि वैद्यकांकडून चावा पश्चात लसीकरण घ्या.

logo
marathi.freepressjournal.in