
नवी मुंबईत विविध प्रकल्प कामे सुरु असून या कामांची सद्यस्थिती जाणून घेणे व त्या कामांना गती देणे यादृष्टीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर विविध प्रकल्प स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करीत आहेत. आयुक्तांनी बुधवारी सेक्टर १५ सीबीडी बेलापूर येथील बहुमजली वाहनतळ बांधकामाची तसेच वंडर्स पार्क, सेक्टर १९ नेरूळ येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.
सेक्टर १५ बेलापूर येथील भूखंड क्रमांक ३९ याठिकाणी ४ मजली बहुमजली वाहनतळ विकसित करण्यात येत आहे. सद्यस्थितीत ३ स्लॅबचे काम पूर्ण झाले असून आयुक्तांनी संपूर्ण बांधकामाची बारकाईने पाहणी केली. या भागामध्ये महावितरणाचे सबस्टेशन असल्याने इमारतीच्या आराखड्यामध्ये काहीसा बदल करण्याची गरज भासली आणि वाहनतळ आराखड्यात तशा प्रकारचा बदल करूनच कामाला सुरूवात करण्यात आल्याची माहिती यावेळी आयुक्तांना देण्यात आली. वाहनतळाच्या पाहणीअंती आयुक्तांनी जानेवारीपर्यंत काम पूर्ण होईल अशा दृष्टीने नियोजनबद्ध काम करावे असे निर्देश दिले. या ४ मजली बहुमजली वाहनतळात ४७६ चारचाकी वाहने व १२१ दुचाकी वाहने पार्कींग करण्यासाठी सुविधा उपलब्ध असणार आहे. याठिकाणी चार्जींग स्टेशनची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे असेही आयुक्तांनी यावेळी सूचित केले.
त्याचप्रमाणे सेक्टर १९ नेरूळ येथील वंडर्स पार्क हे नवी मुंबईकर नागरिकांप्रमाणेच नवी मुंबईला भेटी देणाऱ्या इतर शहरांतील नागरिकांचे व पर्यटकांचेही आकर्षण केंद्र असून त्याच्या नुतनीकरणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. या कामाची पाहणी करताना आयुक्तांनी तेथील अत्याधुनिक खेळणी (राईड्स) व्यवस्थितरित्या बसविली जातील याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देश अभियंत्यांना दिले.
याप्रसंगी शहर अभियंता संजय देसाई, कार्यकारी अभियंताअरविंद शिंदे, सुभाष सोनावणे, गिरीश गुमास्ते, बेलापूर विभागाच्या सहाय्यक आयुक्त मिताली संचेती आणि इतर अभियंते उपस्थित होते.