मानवनिर्मित धोकाच जीवघेणा!

कोट्यवधी रुपयांचा खर्च हा व्यर्थ होत असून मानवनिर्मित धोका आता तरी रोखा, सर्वसामान्य मुंबईकरांच्या जीवाची पर्वा करा
File Photo
File Photo

रस्ता खचणे, इमारत कोसळणे, पूल कोसळणे, झाड अंगावर पडून एखाद्याचा मृत्यू होणे या दुर्घटना मानवनिर्मित प्रकारात मोडतात. रस्ते काम असो वा पूल उभारणे प्रत्येक कामासाठी मुंबई महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र काही वर्षांतच रस्त्यांची दूरवस्था तर पुलाची जीर्ण अवस्था होते. एखादे काम नियोजनबद्ध पद्धतीने केले आणि कामात इच्छाशक्ती असेल तर ते काम १०० टक्के यशस्वी पूर्ण होते. परंतु प्रत्येक कामात अर्थपूर्ण राजकारण करायचे, अशी काही भ्रष्ट अधिकारी आणि नेतेमंडळींना सवयच जडली आहे. हीच सवय एखाद्याचा जीव घेऊ शकत असल्यामुळे मानवनिर्मित संकटच जीवघेणे ठरू शकते.

नालेसफाईचे काम १०० टक्के पूर्ण, सिमेंट क्राँकिटचे रस्ते पुढील दोन वर्षांत, मजबूत व टिकाऊ पूल या घोषणा राजकीय नेते मंडळी नव्हे तर मुंबई महापालिकाच करते. सहा हजार कोटींचे सिमेंट क्राँकिटचे रस्ते, २८० कोटींची नालेसफाई, सृदृढ आरोग्यासाठी कोट्यवधी रुपये, करदात्या मुंबईकरांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होतात, असे भासवण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाकडून केला जात असावा. कारण कोट्यवधी रुपये खर्चून मुंबईकरांच्या नशीबी समस्या, मृत्यू ओढवणार असेल तर खर्च होणारे कोट्यवधी रुपये खर्च कुठे होतात, याचे उत्तर दस्तुरखुद्द मुंबई महापालिकाच देऊ शकते. आडव्या-उभ्या मुंबईचा विकास झपाट्याने होत आहे. विकास होत असताना मुलभूत सुविधांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. २४ तास पाणी, पावसाळ्यात मुंबई जलमय होऊ नये, आरोग्य सेवा सृदृढ असावी, मुंबई कचरामुक्त, रस्ते खड्डेमुक्त या सुविधा मिळाव्यात, याच करदात्या मुंबईकरांच्या अपेक्षा. परंतु विकासाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र आजही मुंबईकरांना समस्यांचा सामना करावा लागतो, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. रस्त्यांची कामे असो वा पुलांची कामे यावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. बहुतांश कामांसाठी सल्लागारांची नियुक्ती करून त्याच्यावर कोट्यवधी रुपयांची उधळण केली जाते. मात्र काही वर्षे उलटत नाही, तोच नवीन रस्ते व पूल मुंबईकरांचे बळी घेतात. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च हा व्यर्थ होत असून मानवनिर्मित धोका आता तरी रोखा, सर्वसामान्य मुंबईकरांच्या जीवाची पर्वा करा, हे म्हणण्याची वेळ सर्वसामान्य मुंबईकरांवर येणे यापेक्षा दुर्दैव काय असू शकते.

घटना घडली की आरोप-प्रत्यारोप करत लहान माशांवर कारवाईचा फार्स आवळला जातो. मात्र कालातंराने ‘ये-रे माझ्या मागल्या’ म्हणीप्रमाणे पुढील घटनेची वाट पाहिली जाते. मुंबईत रस्ते खचणे, पावसाळ्यात रस्ते जलमय होणे, झाड अथवा झाडाची फांदी कोसळणे तर कधी शौचालय खचणे या गोष्टी मुंबईकरांच्या जीवाशी आधीच खेळत आहेत. विशेष म्हणजे मुंबईकरांच्या जीवाची काळजी घेत असल्याचा दावा करत या कामांसाठी हजार नव्हे, लाखो नव्हे तर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र एखाद-दुसरे वर्ष होत नाही, तोच सगळे दावे आश्वासनांच्या फेऱ्यात वाहून गेलेले दिसतात. त्यामुळे हा कोट्यवधी रुपयांचा खर्च नेमका जातो तरी कुठे, असा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

‘मुंबई शहर हादसौ का शहर’, हे वाक्य आजच्या मुंबईला चपखलपणे लागू होते. झाड व झाडाची फांदी कोसळणे, इमारत अथवा इमारतीचा भाग कोसळणे, आग लागणे, रस्ता खचणे या गोष्टी आता मुंबईकरांसाठी सवयीच्या झाल्या आहेत. या मानवनिर्मित मृत्यूला आताचे भ्रष्टाचारी तर जबाबदार आहेतच, पण ही भ्रष्टाचाराची कीड नव्याने लागली नसून वर्षानुवर्षे ही कीड पसरली जात असून याला भ्रष्ट अधिकारी जबाबदार आहेत. दोन इमारतींमध्ये १५ मीटरचे अंतर ठेवणे विकासकाला बंधनकारक आहे. मात्र पैशांच्या लालसेपोटी काही भ्रष्ट अधिकारी नियम पायदळी तुडवत विकासकाशी हातमिळवणी करून मुंबईकरांच्या जीवाशी खेळतात. संबंधित भ्रष्ट यंत्रणांमुळे मुंबईकरांच्या नशीबी पावलोपावली मृत्यूचा सापळा रचला जात असून मनुष्यहानी होण्यास संबंधित यंत्रणाच जबाबदार आहेत. घराबाहेर कामानिमित्त पडणारा घराचा कमवता व्यक्ती संध्याकाळी घरी परत येईल की नाही, याची शाश्वती आजच्या घडीला देणे शक्य नाही. भ्रष्टाचाऱ्यांसाठी काही गोष्टी कमाईचे साधन झाले असले तरी कुठली वेळ कोणावर कधी येईल हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे आपला जीव महत्त्वाचा त्याचप्रमाणे दुसऱ्याचाही जीव तितकाच महत्त्वाचा याचा विचार करत मानवनिर्मित संकट टाळण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

झाड व झाडाची फांदी कोसळणे, इमारत अथवा इमारतीचा भाग कोसळणे, आग लागणे, रस्ता खचणे या गोष्टी मुंबईकरांच्या जीवनात नेहमीच दुख:द अनुभव घेऊन येतात. या घटनांमुळे आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला असून अनेक जण जखमी झाले आहेत. पावसाळ्यात तर इमारत अथवा इमारतीचा भाग कोसळणे, अशा घटना दरवर्षीच घडततात. मात्र घटना घडली की, आरोप-प्रत्यारोप करायचे, राजकारण करायचे आणि नंतर ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’, असा कारभार दिसून येतो. परंतु करदात्या मुंबईकरांमुळे पालिकेच्या तिजोरीत वर्षाला कोट्यवधींचा महसूल जमा होत असल्याने आर्थिक गाडा हाकणाऱ्या मुंबई महापालिकेतील काही भ्रष्ट अधिकारी मुंबईकरांच्या जीवाची पर्वा आता तरी करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

मुंबईकरही तितकेच जबाबदार!

मुंबईत मोकळी जागा मिळेल तिकडे बेकायदा इमले उभारले जातात.‌ बेकायदा इमले उभारणीत स्थानिक भूमाफिया सक्रिय असले तरी त्यांच्यावर आशीर्वाद काही नेतेमंडळींचा असतो. परंतु आपल्या प्रभागात एखादी गोष्ट बेकायदा होत असून हीच आपल्यासाठी जीवघेणी ठरू शकते, हे दिसत असतानाही आपण डोळे मिटून घेतो. दुर्घटना घडली की मुंबई महापालिकेसह संबंधित यंत्रणांवर खापर फोडून मोकळे होते. परंतु एखादी गोष्ट बेकायदा होऊ नये, याची काळजी प्रत्येकाने घेतली तर मात्र मानवनिर्मित संकट टाळणे शक्य होईल. त्यामुळे मुंबईत मानवनिर्मित घटना घडण्यास मुंबईकरही तितकेच जबाबदार आहोत, याचा विचार करणे काळाची गरज आहे.

logo
marathi.freepressjournal.in