
मुंबई : घरफोडीच्या गुन्ह्यांतील एका रेकॉर्डवरील स्पायडरमॅन गुन्हेगाराला एमएचबी पोलिसांनी अटक केली. रोहित रमेश राठोड असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात १९ हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. पोलीस कोठडीनंतर त्याची बोरिवलीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. जून महिन्यांत श्वेता टेकचंद बीरा या महिलेच्या घरी घरफोडी झाली होती. अज्ञात चोरट्याने तिच्या दहिसर येथील राजाराम तावडे रोड, म्हात्रे वाडीतील अर्पिता अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये इमारतीच्या ड्रेनेज पाईपवरून चढून प्रवेश केला होता. त्यानंतर तो त्याच पाईपवरून खाली उतरून पळून गेला होता.
यावेळी तो इमारतीवरुन खाली पडून जखमी झाला होता. आरोपी हा सांताक्रुझ येथील रामकिशन हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना दिसून आला. उपचारानंतर त्याला सोडून देण्यात आले होते. यावेळी त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान त्याने ही घरफोडी कबुली दिली होती. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. रोहित राठोड हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध १९ हून अधिक चोरी, घरफोडी, तोतयागिरी करून फसवणूक करणे, गंभीर दुखापत करून रॉबरी करणे अशा गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.