रस्त्यांवर थूंकणे, कचरा फेकणे पडणार महागात ; क्लीनअप मार्शल २०० रुपये दंड आकारणार

पालिकेच्या प्रत्येक वॉर्डात २५ ते ३० क्लीनअप मार्शल तैनात करण्यात येणार आहेत
रस्त्यांवर थूंकणे, कचरा फेकणे पडणार महागात ; क्लीनअप मार्शल २०० रुपये दंड आकारणार
Published on

स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला असून त्यासाठी मुंबईकरांनी सहकार्य करणे अपेक्षित असून रस्त्यावर थूंकणे, कचरा फेकणे यावर क्लीनअप मार्शलची नजर असणार आहे. थूंकणे, कचरा फेकणाऱ्यांकडून २०० रुपये ते एक हजारांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. पालिकेच्या प्रत्येक वॉर्डात २५ ते ३० क्लीनअप मार्शल तैनात करण्यात येणार आहेत.

कोरोना काळात तोंडावर मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसाठी क्लीनअप मार्शलची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु क्लीनअप मार्शलची नियुक्ती वादात सापडली होती. वसुली मार्शल म्हणून क्लीनअप मार्शलची ओळख झाली होती. क्लीनअप मार्शलच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता, त्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली होती. परंतु स्वच्छ मुंबईसाठी ५ हजार स्वच्छतादूत नियुक्त केले जाणार असून क्लीनअप मार्शलची नियुक्ती करण्यात येणार आहे. ‘क्लीनअप मार्शल’कडून अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. यामध्ये आकारलेल्या दंडाची अर्धी रक्कम संबंधित कंत्राटदाराला तर अर्धी रक्कम पालिकेला मिळणार असल्याने पालिकेच्या महसूलात वाढ होणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, ‘क्लीनअप मार्शल’ नेमण्यासाठी याआधी नेमण्यात आलेल्या निविदेला प्रतिसाद मिळाला नसल्याने नव्याने निविदा मागवण्यात येत आहेत.

दंडाची रक्कम ऑनलाइन?

‘क्लिनअप मार्शल’कडून दंड वसूल करताना काही वेळा नियम मोडणाऱ्यांसोबत वादावादीचे प्रसंग घडतात. तर कधी दंड वसूल करताना भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होतो. कोरोना काळात ‘क्लीनअप मार्शल’ना मास्क न वापरणाऱ्यांकडून दंड घेण्याचे अधिकार दिले असताना अनेक आरोप करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर दंड घेण्याची सुविधा ऑनलाइन करण्याबाबत विचार सुरू असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हे करणे टाळा

- सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर थुंकणे

- सार्वजनिक ठिकाणी घाण करणे

- उघड्यावर नैसर्गिक विधी उरकणे

- बेकायदेशीररीत्या भटक्या प्राण्यांना खाऊ घालणे

- पाळीव श्वानांना फिरवताना घाण करणे

logo
marathi.freepressjournal.in