सलग चार दिवस सुट्ट्या आल्यामुळे राज्यातील सर्वच पर्यटन, धार्मिक स्थळे पर्यटकांनी तुडुंब भरलेली आहेत. मुंबईच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयालाही पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. गेल्या तीन दिवसांत ४३ हजार ४२० प्रेक्षकांनी राणीबागेत जाऊन तेथील निसर्गसौंदर्याचा तसेच तेथील प्राण्यांसोबत धम्माल मस्ती केली आहे. त्यातच सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने तब्बल २० हजार प्रेक्षकांनी राणीबागेत हजेरी लावली.एका दिवसात सर्वाधिक ३० हजार ३७९ प्रेक्षकांनी हजेरी लावल्याचा विक्रम यावर्षीच्या मे महिन्यात नोंदवला गेला होता. राणीबागेत रोज तीन ते चार हजार तर आठवड्याच्या शेवटी १२ ते १५ हजार पर्यटकांची उपस्थिती असते. सध्या राणीबागेत विविध प्राणी आणि पक्षी दाखल झाल्याने ते पाहण्यासाठी प्रेक्षकांची तोबा गर्दी होत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत राणीबागेत येणाऱ्यांची संख्या खूप असते; मात्र शाळा सुरू झाल्यानंतर येथील गर्दी ओसरत जाते. आता चार दिवसांची प्रदीर्घ सुट्टी आल्याचा मेळ साधत १३ ते १६ ऑगस्टदरम्यान राणीबाग पर्यटकांनी फुलून गेली आहे. शनिवारी ६८१९ पर्यटकांनी राणीबागेत येऊन निसर्गसौंदर्यासहित प्राणिसंग्रहालयालाही भेट दिली. रविवारी आणि सोमवारी येणाऱ्या पर्यटकांवर नियंत्रण राखताना वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागली. रविवारी १६,६६६ तर सोमवारी १९,८३५ पर्यटकांनी हजेरी लावली. यामुळे गेल्या तीन दिवसांत पालिकेच्या तिजोरीत १५ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचा महसूल जमा झाला आहे.