भारतीय कैद्यांच्या मोबाईलने हेरगिरी ;आयएसआयचा नवीन फंडा

सध्याच्या तपासामुळे त्यांना या मच्छिमारांच्या क्रमांकावरून कॉल्स घेणाऱ्या व्यक्तीचे नाव उघड करण्यास मनाई आहे.
भारतीय कैद्यांच्या मोबाईलने हेरगिरी ;आयएसआयचा नवीन फंडा

मुंबई : पाकिस्तानच्या तुरुंगातील भारतीय मच्छिमार कैद्यांच्या फोन क्रमांकाचा वापर पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ हेरगिरीसाठी करत असल्याचे उघड झाले आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी याची अत्यंत गुप्त माहिती भारतीय सुरक्षा यंत्रणांनी दिली आहे.

महाराष्ट्र व गुजरातमधील मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. या मच्छीमारांचे मोबाईल फोन पाकिस्तानने काढून घेतले आहेत. त्या फोनमधील भारतीय क्रमांकावरून आयएसआय पाकची गुप्तचर यंत्रणा भारतातील आपल्या एजंटशी गुप्तपणे संपर्कात आहे. केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडे त्यांच्या योजना आणि हालचालींबद्दल विशिष्ट माहिती नसली तरी, त्यांना संशय आहे की पाकिस्तानी एजन्सी या मच्छिमारांच्या सिमकार्डचा वापर करून गुप्त कारवाया करत असावी.

केंद्रीय सुरक्षा यंत्रणांच्या बैठकीत झालेली माहिती ‘नवशक्ति’कडे आहे. त्यात आयएसआयच्या कुख्यात कारवायांचा समावेश आहे. पाकिस्तानात अडकलेल्या मच्छीमारांची सिमकार्ड ब्लॉक करावीत, अशी सूचना केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी केली. तसेच पाकिस्तानात पकडल्या गेलेल्या मच्छीमारांची माहिती गोळा करणारी यंत्रणा विकसित करावी. त्यात मोबाईल क्रमांकाचाही समावेश असावा.

वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून खोल समुद्रात गेलेल्या भारतीय मच्छीमारांना पाकिस्तान सुरक्षा यंत्रणांनी पकडले आहे. पुढील तपासासाठी मोबाईल क्रमांकाचा डेटा गोळा केला आहे. अनेक मच्छीमार पाकिस्तानी तुरुंगात असूनही त्यांचे मोबाईल क्रमांक अनेक महिने, वर्षे ॲॅक्टीव्ह आहेत. त्यांच्या मोबाईलवर आंतरराष्ट्रीय रोमिंग, व्हॉटस‌्ॲॅप कॉल, फेसॲॅप कॉल, बनावट सोशल मीडिया प्रोफाईल आदी आहेत. हे सर्व संशयित पाकिस्तानी यंत्रणांनी बनवले. यातून पाकिस्तानी यंत्रणा या मच्छीमारांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर कसा करतात हे दिसून येते.

अधिकाऱ्याने सांगितले की, सध्याच्या तपासामुळे त्यांना या मच्छिमारांच्या क्रमांकावरून कॉल्स घेणाऱ्या व्यक्तीचे नाव उघड करण्यास मनाई आहे. सध्या या प्रकरणाचा सर्वंकष तपास सुरू आहे. त्याचा तपशील या क्षणी उघड करणे अयोग्य आहे.

सिमकार्डचा वेगवेगळ्या

हॅन्डसेटमध्ये वापर

अधिकाऱ्यांनी सांगितले की, या मच्छीमारांना पकडल्यानंतर पाकिस्तानी यंत्रणा त्यांचे मोबाईल फोन ताब्यात घेऊन त्यातील सिमकार्ड काढतात. ते सिमकार्ड कुठल्या राज्याचे व शहराचे आहे, याचा शोध घेतात. त्यानंतर भारतात राहणाऱ्या आयएसआयच्या एजंटला या मोबाईल फोनला इंटरनेट किंवा मोबाईल प्लॅन योग्य ठरेल तो दिला जातो. विशेष म्हणजे हे सिमकार्ड वेगवेगळ्या मोबाईल हँडसेटमध्ये फिरवले जाते. या फोन क्रमांकावर दीर्घकाळ संभाषण व चॅटस‌् केल्याचे आढळले आहे.

logo
marathi.freepressjournal.in