पाकची एपीके फाईल्समधून हेरगिरी भारतीय लष्करी अधिकाऱ्यांना केले लक्ष्य

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा संघटितपणे भारतीय लष्करी अधिकाऱ्यांना ‘एपीके’ ऑपरेशन्सद्वारे गळाला लावण्याचा प्रयत्न करत आहे
पाकची एपीके फाईल्समधून हेरगिरी भारतीय लष्करी अधिकाऱ्यांना केले लक्ष्य

मुंबई : भारतात हेरगिरी करण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा वेगवेगळ्या साधनांचा वापर करत आहे. पाकच्या गुप्तचर यंत्रणेने आता अत्याधुनिक ‘एपीके’ फाईल्सचा वापर करून भारतीय लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘टार्गेट’ करण्यास सुरुवात केली आहे, अशी खात्रीलायक माहिती भारत सरकारच्या गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. ही बाब देशाच्या सुरक्षेला मोठा धोका पोहचवणारी आहे.

गुप्तचर यंत्रणांनी दिलेला अहवाल सर्व केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना कळवण्यात आला आहे. पाकिस्तानी गुप्तचर जाळे अत्याधुनिक हॅकिंग, उच्चस्तरीय कौशल्य वापरून टार्गेट करत आहे. भारतीय लष्करी अधिकारी व संरक्षण सेवेतील सैनिकांना लक्ष केंद्रीत केले आहे.

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा संघटितपणे भारतीय लष्करी अधिकाऱ्यांना ‘एपीके’ ऑपरेशन्सद्वारे गळाला लावण्याचा प्रयत्न करत आहे. पाकच्या गुप्तचर यंत्रणा व्हॉटस‌्ॲॅप व टेलिग्रामद्वारे ‘एपीके’फाईल्स पाठवतात. विशेष म्हणजे या फाईलमध्ये त्यांचे नाव, त्यांचे लष्करातील स्थान, उपलब्ध केलेला निधी याचा सर्व माहिती त्यात असते. जेव्हा संबंधित भारतीय लष्करी अधिकारी ही फाईल उघडतो. तेव्हा त्यांच्या मोबाईलमधील सर्व सिस्टीम त्यांच्या नकळत खराब होते. त्यांच्या मोबाईलमध्ये घुसखोरी केली जाते. त्यांच्या मोबाईलमधील राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणारी संवेदनशील माहिती पळवली जाते, असे भारतीय गुप्तचर यंत्रणांना कळले आहे.

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी भरतपूर, मेवात व मथुरा या त्रिकोणात हेरगिरीवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. ऑनलाईन घोटाळे, ब्लॅकमेल करणे व हॅकिंग आदी पद्धती त्यासाठी वापरल्या जातात.

भारतीय गुप्तचर यंत्रणातील खात्रीलायक सूत्रांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यात निमलष्करी दलातील अधिकारी व जवानांना ‘एपीके’ फाईल्स आल्या आहेत. या फाईल्समध्ये सरकारी अधिसूचना, संरक्षण संबंधी योजना व बनावट योजना असतात. संबंधित अधिकारी व जवानाला रोज कमिशन देण्याचे आमीष त्यात दाखवले जाते. तर काहींना उत्पादने विकत घेतल्यास सवलत देण्याचे आमीष दिले जाते. त्यासाठी थर्डपार्टी एपीके ॲप्लीकेशन लिंक्स दिल्या जातात. संबंधित जवानाला भुरळ पाडणारा हा डेटा असतो.

वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव सांगण्याच्या अटीवर सांगितले की, एपीके फाईल्सचा मारा संबंधित अधिकारी व जवानाच्या मोबाईलवर केला जातो. तसेच त्या संरक्षण खात्यातील जवानाला ब्लॅकमेल करण्याची धमकी दिली जाते. तुमची वैयक्तीक माहिती सोशल मीडियावर टाकली जाईल, असे सांगून त्यांना भीती घातली जाते.

केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने सर्व सुरक्षा यंत्रणांना याबाबत लष्कराच्या गुप्तचर यंत्रणांना संबंधित संशयितांची माहिती देण्यास सांगितले आहे. कारण संशयित व्यक्तीकडून पुरावे नष्ट होण्यापूर्वी कारवाई करावी, असे गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे.

कामगार, मजुरांचा आधार

संरक्षण खात्यातील कामगार, मजूर व पुरवठादारांना टार्गेट करतात. हवाई दलाच्या स्टेशन्सवरील काही कंत्राटी कामगारांपर्यंत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा पोहोचली होती. जामनगर येथे जेवण बनवणाऱ्या दोघांपर्यंत पाकच्या गुप्तचर यंत्रणा पोहोचली होती. हा चिंतेचा विषय आहे.

logo
marathi.freepressjournal.in