आगीत लालपरी होरपळतेय!

आगीत लालपरी होरपळतेय!

चालू वर्षात आगीच्या चार घटना; राज्य सरकारचे दुर्लक्ष

एकीकडे एसटी महामंडळ आर्थिक समस्यांचा सामना करत असताना दुसऱ्या बाजूला एसटी अपघात, एसटी बसेसना आग लागण्याच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. नागपूर- अमरावती मार्गावर ४ एप्रिलला एसटी महामंडळाच्या एका शिवशाही बसला आग लागल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी ६ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास नागपूर- भंडारा महामार्गावरही एका शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली. वेळीच प्रवासी बसमधून उतरल्याने अनुचित प्रकार टळला. चालू वर्षातील ही चौथी घटना असून एसटी महामंडळाच्या कार्यपद्धतीवर सर्वच स्तरातून प्रश्न उपस्थित होत आहे. नादुरुस्त बसेस, यांत्रिकी विभागाचे दुर्लक्ष आणि नव्या बसेस दाखल होण्यास विलंब यामुळे एसटी अपघात, एसटी बसेसना आग लागण्याच्या घटना वारंवार उघडकीस येत आहेत. सर्वसामान्यांची लालपरी मागील काही महिन्यांपासून आगीच्या घटनांनी होरपळून निघत असून, राज्य सरकारचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

सलग ७३ वर्षे राज्यातील शहरांपासून खेड्यापाड्यापर्यंत सर्वसामान्यांना सेवा देणारी एसटी अनेक वर्षांपासून सातत्याने तोटा सहन करत आहे. मधल्या काळात २ वर्षे कोरोना विषाणूचा विळखा, यानंतर सर्वाधिक ६ महिने चाललेला एसटी संप यामुळे प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली. यानंतर राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांचा मोफत एसटी प्रवास आणि महिलांना तिकीट दरात ५० टक्के कपात यांसारखे निर्णय घेत एसटी महामंडळाचा महसूल वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले; मात्र एसटी महामंडळाच्या बसेसची दयनीय अवस्था, नियोजनशून्य कारभार यामुळे एसटी अपघात, एसटी बसेसना आग लागण्याच्या घटना राज्यभरात वाढू लागल्या आहेत.

दरम्यान, मधल्या काळात राज्यात झालेल्या सत्ता बदलानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन मंत्री हे पद स्वीकारल्यानंतर एसटी महामंडळात आमूलाग्र बदल होण्याची अपेक्षा होती; मात्र दुर्दैवाने अद्याप कोणतेही सरकार राज्य परिवहन विभागाचा गांभीर्याने विचार करीत नसल्याने एसटीला घरघर लागून जनतेचे हाल होत असल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे.

अलीकडेच नव्या वर्षात चार वेळा एसटी बसेसमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. नाशिक, ठाणे आणि नागपूर याठिकाणी या घटना घडल्या असून, या घटनांबाबत राज्य सरकारने कोणतीही चौकशी अथवा कारवाई केली नसल्याने एसटीच्या एकूण कारभाराबाबत प्रवाशांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

आग लागण्याचा घटनाक्रम

  • ६ एप्रिल २०२३ - नागपुरच्या घाट रोड आगारातील शिवशाही बस नागपूरहून भंडारासाठी निघाली असताना मौदा रोडवर सकाळी ९ वाजताच्या दरम्यान अचानक बसच्या सायलेंसर आणि सभोवतालच्या रबर घर्षणामुळे आग लागून धूर निघू लागला. हा प्रकार बसच्या चालक- वाहकाच्या निदर्शनात येताच बसमधील अग्निशमन यंत्राच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले.

  • ४ एप्रिल २०२३ - नाशिकच्या बस डेपो मधून सायंकाळी ५ वाजता मुंबई नाका येथील महामार्गावर बोरवलीला जाण्यासाठी बस आली. बसमध्ये प्रवासी चढण्याअगोदरच काही वेळातच बसच्या मागील बाजूचे टायर फुटले. काही क्षणातच टायरने पेट घेत बसला आगीच्या विळख्यात घेतले.

  • २५ फेब्रुवारी २०२३ - नाशिकमध्ये धावत्या एसटी बसला आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

  • ३ जानेवारी २०२३ - ठाण्यातून सुमारे ६५ प्रवासी घेऊन भिवंडीला निघालेल्या एसटी बसला आग लागल्याची घटना ठाण्यातील उथळसर रोड येथे सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.

  • ८ डिसेंबर २०२२ - नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे पळसे टोल नाक्याजवळ दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला. ब्रेक फेल झाल्याने एसटी बसने तीन दुचाकींना धडक दिली. अपघातानंतर एसटी बसला भीषण आग लागली.

आगीच्या घटना नेमक्या कशामुळे घडत आहेत याबाबत तपास सुरू आहे. प्रत्येक ठिकाणच्या घटना या वेगवेगळ्या असून, त्याची कारणे देखील वेगळी आहेत. याचबाबत संबंधित घटनांची चौकशी करण्यात येत आहे. तपासानंतर याचे नेमके कारण समजू शकेल.

- शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

इलेक्ट्रिक बसेससाठी आणखी थांबा!

इंधनावरील होणारा अधिकचा खर्च कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने विद्युत बस खरेदी करण्याचा निर्णय गतवर्षी घेतला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १५० बस खरेदी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तर चालू वर्षात मार्च अखेरपर्यंत ७५ बस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार होत्या. प्रत्यक्षात केवळ एक बस अहमदनगर ते पुणे या मार्गावर धावत आहे. उर्वरित इलेक्ट्रिक बसेसची बॅटरी आणि विविध तांत्रिक कामे सुरू असून, बसेस ताफ्यात दाखल होण्यास आणखी विलंब होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in