
संपानंतर राज्यभरात एसटीने पुन्हा सुसाट धावण्यास सुरुवात केली आहे. २२ एप्रिलपासून राज्यातील सर्वच आगारांत पूर्ण क्षमतेने एसटी वाहतूक सुरु झाली. वाहतुकीद्वारे महामंडळाने दीड महिन्यांत तब्ब्ल ५२१ कोटींची कमाई केल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. दरम्यान, अडीच वर्षे प्रवाशांशी एसटीची तुटलेली नाळ पुन्हा जोडली जात असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तसेच परिवहनमंत्री अनिल परब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत २२ एप्रिलपासून बहुतांश एसटी कर्मचारी पुन्हा कामावर हजर झाले. सद्यस्थितीत ९१ हजार म्हणजे ९५ टक्के कर्मचारी पुन्हा कामावर परतले असून मागील काही दिवसांपासून पुन्हा एसटी सर्वत्र दिसू लागली आहे. सुरुवातीला १२ हजार ५०० एसटी बसेस मार्गांवर धावत होत्या. याद्वारे प्रतिदिन जवळपास १३ कोटींपर्यंत उत्पन्न महामंडळाला मिळत होते; मात्र सद्यस्थितीत प्रतिदिन १४ हजार एसटी बसेस धावत असून दररोजचे उत्पन्न १७ कोटींवर पोहचले आहे. दरम्यान, १ एप्रिल ते १५ मे या अवघ्या दीड महिन्यांतच एसटीला ५२१ कोटींचे उत्पन्न मिळाल्याची माहिती एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
‘प्रवासी मित्र’द्वारे प्रवाशांना केले जातेय आवाहन
७ महिने सुरु राहिलेला एसटी संप प्रवासी घटण्याचे मुख्य कारण होते. त्यानंतर घटलेली प्रवासी संख्या पुन्हा वाढविण्यासाठी महामंडळाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. नुकतेच महामंडळाने ‘प्रवासी मित्र’ ही संकल्पना सुरु केली आहे. राज्यातील बहुतेक गावांपर्यंत पोहचलेल्या एसटीमध्ये प्रवासी वाढावेत म्हणून एसटी स्टॅण्डपासून जवळच असलेल्या खासगी वाहनांच्या थांब्याजवळील प्रवाशांना एसटीने जाण्यासंबंधी ‘प्रवासी मित्र’द्वारे आवाहन केले जात आहे.
प्रतिदिन एकूण उत्पन्न - १६.८४ कोटी
धावणाऱ्या एकूण बस - १४ हजार
एप्रिल महिन्यातील उत्पन्न - २९६ कोटी
मे महिन्यातील उत्पन्न - २२९ कोटी ( १५ मे पर्यंत)