राज्यातील एसटी सेवा १५ दिवसांत पूर्ववत होणार

एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात नुकताच यासंदर्भात आढावा घेण्यात आला
राज्यातील एसटी सेवा १५ दिवसांत पूर्ववत होणार

कोरोना आणि त्यानंतर ६ महिने चाललेला एसटी संप यानंतरही राज्यातील एसटी वाहतूक पूर्वपदावर आलेली नाही. ताफ्यातील १५ हजार ८६९ गाड्यांपैकी १३ हजार गाडय़ा सध्या सेवेत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला नादुरुस्त बसगाड्या, नवीन बस गाड्यांची रखडलेली खरेदी यामुळे प्रवाशांना आजतागायत वाहतुकीसाठी अडचण होत आहे. दरम्यान, याबाबत एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका सुरु असून राज्यातील शहर आणि ग्रामीण भागातील एसटी सेवा येत्या १५ दिवसांत पूर्ववत होईल असे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.

एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात नुकताच यासंदर्भात आढावा घेण्यात आला. ताफ्यात नवीन गाड्या लवकरच दाखल करणे, नादुरुस्त बसची दुरुस्ती करुन सेवेत आणणे, ग्रामीण भागातील बस संख्या पूर्ववत करणे यावर चर्चा करण्यात आल्या. या बैठकीत एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने तसेच वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वाहतूक विभागाला ग्रामीण भागातील एसटी सेवा पूर्ववत करण्याचे, तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने काळजी घेऊन बसगाडय़ांचे नियोजन करण्याची सूचना करण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांत नवीन बसगाड्या खरेदी केलेल्या नाही. त्यातच नादुरुस्त बसगाड्याची संख्या वाढत असून दुरुस्ती करुन त्या सेवेत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाकाळात शाळा बंद होत्या. त्यानंतर कमी अंतरावरील विद्यार्थ्यांसाठीच्या बस लांब पल्ल्याच्या मार्गावर वळवण्यात आल्या. त्यांची सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in