मध्य रेल्वेवर वॉचटॉवर पायलट नावाचा प्रोजेक्ट सुरु

मागील काही महिन्यांपासून रेल्वे स्थानक तसेच रेल्वे प्रवासादरम्यान घडणाऱ्या घटनांमध्ये वाढ झाली आहे
मध्य रेल्वेवर वॉचटॉवर पायलट नावाचा प्रोजेक्ट सुरु

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेकडून विविध हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. कोरोनाकाळात प्रलंबित सीसीटीव्ही आणि महिला डब्यातील टॉक बॅक यंत्रणा प्रकल्पांना सुरुवात करण्यात आली आहे. यापाठोपाठ रेल्वेफलाटावर, पादचारी पुलांवर होणारी गर्दी आणि गर्दीमुळे घडणाऱ्या गुन्हे रोखण्यासाठी मध्य रेल्वेने ‘वॉचटॉवर’ नावाचा पायलट प्रोजेक्ट मध्य रेल्वेवर राबवण्यास सुरुवात केली आहे.

दादर स्थानकात या उपक्रमास सुरुवात झाली असून, गर्दीच्या वेळेत रेल्वे सुरक्षा दलाकडून लाउडस्पीकर असलेल्या उंच खुर्चीवर बसून स्थानकात टेहळणी सुरू आहे. याद्वारे पोलीस प्रशासनाकडून प्रवाशांची सुरळीत हालचाल तसेच स्थानक आणि पादचारी पुलांवरील गर्दी नियंत्रण इत्यादी गोष्टींवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

सुरक्षित प्रवास म्हणून रेल्वे प्रवासाकडे पाहिले जाते. मध्य रेल्वे मार्गावर प्रतिदिन तीन ते चार लाख प्रवासी प्रवास करतात; मात्र मागील काही महिन्यांपासून रेल्वे स्थानक तसेच रेल्वे प्रवासादरम्यान घडणाऱ्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महिला डब्यात घुसखोरी करणे, चोऱ्या करणे, रेल्वेमध्ये लटकत स्टंट करणे, अपंगांच्या डब्यात घुसखोरी करणे, या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. याशिवाय प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे गर्दीच्या वेळेस धावत्या रेल्वेतून तोल जात पडणे, अथवा धावत रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात अपघात होण्याच्या घटनादेखील अनेक वेळेस सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून महिला सुरक्षेला प्राधान्य देण्यात येत आहे.

काय आहे ‘वॉचटॉवर’ संकल्पना

पूर्वीच्या एल्फिन्स्टन रोड (आता प्रभादेवी) स्टेशन फूट ओव्हर ब्रिजवर २९ सप्टेंबर, २०१७ रोजी चेंगराचेंगरीची घटना घडली होती. ज्यामध्ये २३ लोकांचा मृत्यू, तर ३८ जण जखमी झाले होते. अशा घटना टाळण्यासाठी मध्य रेल्वेने ही संकल्पना अमलात आणली आहे. या उपक्रमात रेल्वेसुरक्षा दलाकडून गर्दीच्या वेळेस प्रत्येक स्थानकात दोन ते तीन पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. या कर्मचाऱ्यांना उंच खुर्ची तसेच हातात मिनी फोन लाउडस्पीकर देण्यात आले आहेत. कर्मचारी ट्रेन आल्यावर फलाटापासून अंतर राखण्याबद्दल प्रवाशांना अलार्म देणार आहेत. तसेच डब्यात गर्दी होत असल्यास प्रवाशांना पुढील ट्रेनची वाट पाहण्याच्या सूचना तसेच पादचारी पुलावर चढत्या-उतरत्या वेळी ढकलाढकली न करता अंतर ठेवत पादचारी पुलाच्या वापराच्या सूचना देणार आहेत. सध्या रेल्वेने दादर स्थानकावर एक वॉचटॉवर उभारण्यात आला आहे. हा यशस्वी झाल्यास कुर्ला, ठाणे रेल्वे स्थानकांबरोबरच इतर वॉचटॉवरही सुरू करण्यात येणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in