'या' अनुवादित पुस्तकाला दिलेला पुरस्कार रद्द केल्याने राज्यात नवा वाद; नेमकं प्रकरण काय?

पुस्तक न वाचता फक्त सोशल मीडियावर करण्यात आलेल्या टिकेवरून राज्य सरकारने उचलेले हे पाऊल, लेखिकेने व्यक्त केली खंत
'या' अनुवादित पुस्तकाला दिलेला पुरस्कार रद्द केल्याने राज्यात नवा वाद; नेमकं प्रकरण काय?

कोबाड गांधींच्या 'फ्रॅक्चर्ड फ्रीडम' या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाला जाहीर झालेला 'तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार' राज्य सरकारने तडकाफडकी रद्द केला. यावरून आता साहित्य वर्तुळातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून विरोधकांनीही यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद करणाऱ्या अनघा लेले यांनीदेखील याबद्दल खंत व्यक्त केली आहे. "पुरस्कार दिला काही तज्ज्ञांच्या समितीने, ट्विटर कोणी आक्षेप घेतला, गदारोळ झाला म्हणून रद्द झाला. पुस्तकही न वाचता, ज्या पद्धतीने गदारोळ करण्यात आला, त्याला जास्त महत्त्व का?" असा सवाल लेखिका अनघा लेले यांनी केला. तर, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी 'पुरस्कार रद्द करून अघोषित आणीबाणी लादण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, "राज्य सरकारने एकूण ३३ पुरस्कार जाहीर केले. अनघा लेले यांना फ्रॅक्चर्ड फ्रिडम या पुस्तकासाठी अनुवादाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. या पुस्तकाला पुरस्कार दिल्यानंतर ६ दिवस काहीच झाले नाही. मात्र, नंतर ६ दिवसात काही घडामोडी घडल्या आणि १२ तारखेला राज्य सरकारने पुरस्कार निवड समिती बरखास्त केली. तर, अनघा लेले यांना जाहीर झालेला पुरस्कार रद्द करण्यात आला. पुरस्कार रद्द करून अघोषित आणीबाणी लादण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे. हे सरकार साहित्य आणि संस्कृती क्षेत्राला नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याने आम्ही त्याचा निषेध करतो."

नेमकं प्रकरण काय?

कोबाड गांधी हे केंद्र सरकारने बंदी घातलेल्या माओवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी सदस्य होते. साधारण १० वर्षे त्यांनी तुरुंगवास भोगला होता. तुरुंगवासातून सुटका झाल्यानंतर त्यांनी तेथील आठवणी 'फ्रॅक्चर्ड फ्रीडम' पुस्तकातून सर्वांसमोर आणल्या. या पुस्तकाचा मराठी अनुवाद लेखिका अनघा लेले यांनी केला. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने ६ डिसेंबरला ३३ साहित्यिकांना 'यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार' जाहीर केले. त्यामध्ये 'फ्रॅक्चर्ड फ्रीडम'च्या अनुवादक अनघा लेले यांना 'तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार' जाहीर झाला. मात्र, ट्विटरवरती काही जणांनी यावर आक्षेप घेतला. त्यानंतर १२ डिसेंबरला त्यांना जाहीर झालेला हा पुरस्कार रद्द करण्यात आला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in