
मुंबई : देशात अल्पावधित लोकप्रिय ठरलेल्या सुला वार्इनची उत्पादक कंपनी सुला वार्इनयार्डला राज्य शासनाने ११६ कोटी रुपये अबकारी कर थकवल्याबाबत नोटीस जारी केली आहे.
याआधी फेब्रुवारी २०१८ मध्ये नाशिकस्थित सुला वार्इनयार्ड कंपनीला कलेक्टरकडून ११५ कोटी रुपये कर चुकवल्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. आता अबकारी कर विभागाकडून ११५.९८ कोटी रुपये थकवल्याची नोटीस कलेक्टरच्या माध्यमातून बजावण्यात आली आहे. सुला हा वार्इन क्षेत्रातील एक नामांकित ब्रॅन्ड असून कंपनीचे महाराष्ट्र आणि कर्नाटकात वार्इन निर्मितीचे कारखाने आहेत. वेगवेगळ्या १३ ब्रॅन्ड नावाने ही कंपनी वार्इनची विक्री करते. पण सुला हा या कंपनीचा ध्वजवाहक प्रमुख ब्रॅन्ड आहे. अन्य लोकप्रिय ब्रॅन्डमध्ये रस, दिंडोरी, द सोर्स, सातेरी, मदिरा आणि दिया ब्रॅन्ड्सचा समावेश आहे.
अबकारी विभागाकडून आलेल्या नोटीशीवर प्रतिक्रिया देतांना कंपनीने म्हटले आहे की यामुळे कंपनीच्या दैनंदिन व्यवहारावर कोणताही परिणाम होत नाही. कंपनी कायद्यानुसारच चालते. त्यामुळे सर्व काही कायद्यानुसार होर्इल, अशी प्रतिक्रिया कंपनीने दिली आहे.