
मुंबई : राज्यात मुंबई, पुण्यासह अनेक शहरांत प्रदूषण धोका पातळीच्या वर गेल्याने राज्य सरकार गंभीर झाले आहे. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यात प्रामुख्याने बांधकामांमुळे होणारे धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांना कठोर उपाय करण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्यातील अनेक शहरांत प्रदूषक पीएम २.५, पीएम १० च्या धुलिकणांच्या मात्रेत वाढ झाल्याचे चित्र आहे. पुण्यात नायट्रोजन डायऑक्साईड (NO2) तर जालन्यात O3 प्रदूषकाची मात्रा वाढली आहे. हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील हवेच्या निर्देशांकात सुधारणा झाली आहे.
मार्गदर्शक तत्त्वे
० पालिका क्षेत्रातील बांधकामांसाठी किमान २५ फूट उंच पत्रे उभारावेत.
० निर्माणाधीन इमारतींना सर्व बाजूंनी ओल्या हिरव्या कपड्याने बंदिस्त करावे
० पाडकामाच्या इमारती ओल्या कपड्याने झाकाव्यात
० बांधकामाचे साहित्य वाहनांतून उतरून घेताना वॉटर फॉगिंग करावे
० बांधकामाच्या मलब्यावर सतत पाण्याची फवारणी करावी
० मलबा वाहून नेणारी सर्व वाहने पूर्णपणे झाकावीत
० सर्व बांधकाम साइट्सनी कामाच्या ठिकाणी वायू प्रदूषण मॉनिटर्स लावणे बंधनकारक
० धुलीकण उडणारी ग्राइंडिंग, ड्रिलिंगसारखी कामे बंदिस्त ठिकाणी करावीत
० बांधकाम कर्मचाऱ्यांना गॉगल्स, हेल्मेट पुरवावेत
० पूल, उड्डाणपुलाच्या कामावर २० फुटांचे बॅरिकेडिंग असावे
० जमिनीवरील मेट्रोची सर्व कामे २० फूट उंचीच्या बॅरिकेडिंगने झाकली जातील.
० अवैध मलबा रोखण्यासाठी विशेष पथके तैनात करा
० उद्योगांच्या वायू प्रदूषणावर प्रदूषण नियंत्रण मंडळ लक्ष ठेवेल