
मुंबई : रक्ताच्या पेशीतील जंतू शोधण्यासाठी डॉक्टरांना तीक्ष्ण मायक्रोस्कोपची गरज असते. केईएम रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागात ४० वर्षांपासून एका डोळ्याने पाहता येणारे मायक्रोस्कोप्स वापरले जात होते. मात्र, आता दोन्ही डोळ्यांनी दिसेल असे अत्याधुनिक मायक्रोस्कोप्स पालिकेने खरेदी करtन दिल्याने डॉक्टरांना रुग्णांच्या अहवालाची चित्रफित पाहण्यासाठी फायदा होणार आहे.
पालिकेच्या केईएम रुग्णालय आणि महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या पद्धतीत आणखी बदल व्हावा आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक मायक्रोस्कोपची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी केईएम रुग्णालय प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. प्रत्येक शिकणाऱ्या विद्यार्थ्याला रक्ताचे नमुने आणि त्यांची चाचणी करता यावी, हा उद्देश होता. मात्र आधीचे मायक्रोस्कोप्स दर्जा राखण्यात कमी पडत होते. आता नवीन अत्याधुनिक ५० मायक्रोस्कोप उपलब्ध झाल्याने रुग्णांच्या अहवालांचे योग्य निदान करता येईल.
हेमॅटोलॉजीसाठी नवीन बायनाक्युलर आणि ट्रायनोक्युलर मायक्रोस्कोप आणले गेले आहेत. कौशल्य प्रशिक्षणासाठी एईडी ट्रेनर युनिटही सज्ज आहे. तसेच सीपीआर, रक्तदाब मोजण्यासाठी मॅनिक्विन्सची सुविधा देण्यात आली आहे. यासह ट्रायनोक्युलर मायक्रोस्कोपचा उपयोग आणखी डिजिटल पद्धतीने करता येईल. एकाच वेळेस किमान १० जणांना एकच इमेज पाहता येणार आहे. यातून, प्रशिक्षण देणे सोपे होईल आणि प्रत्येक विद्यार्थ्याला समजावून सांगण्याची गरज भासणार नाही.
आर्टिफिशल मॅनिक्विन्सवर करता येणार सराव
शरीरशास्त्र विभागात आर्टिफिशयल मॅनिक्विन्स आणले गेले आहेत. यात आर्टिफिशयल बालक आणि हाताचा रक्तदाब कसा घ्यायचा, सीपीआर कसे द्यायचे हे शिकवले जाईल. पूर्वी एखादा कर्मचारी किंवा मुलेच प्रात्यक्षिक करण्यासाठी एकमेकांचा आधार घ्यायचे. आता मॅनिक्विन्सवर काही ठराविक चाचण्यांचा सराव करता येईल.