एक्स्प्रेसमधील रेल्वेच्या पाणी पातळीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे लक्ष

यंत्रणा ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसच्या ११ डब्यांमध्ये बसवण्यात आली आहे
एक्स्प्रेसमधील रेल्वेच्या पाणी पातळीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे लक्ष

मुंबई : लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये प्रवास करणारे प्रवासी प्रसाधनगृह व हात धुण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर करतात. साधारणत: एका डब्यात ७२ प्रवासी असतात. या प्रवाशांकडून पाण्याचा वापर वाढल्यास अनेक प्रवाशांची मोठी अडचण होते. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने एक्स्प्रेसमधील पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवायला खास यंत्रणा विकसित केली आहे. यासाठी इंटरनेटचा वापर केला जाणार आहे.

प्रत्येक रेल्वे डब्यात पाण्याच्या टाक्या बसवलेल्या असतात. या टाक्यांतील पाणी ४० टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास मोबाईल फोन किंवा पीसीवर खास मेसेज रेल्वे स्थानकांना देण्यात येणार आहे. त्यातून रेल्वेच्या डब्यात पाणी भरण्याची व्यवस्था असणाऱ्या रेल्वे स्थानकांना आगाऊ सूचना मिळू शकेल. कारण अनेक ठिकाणी पाणी नसल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने इंटरनेटवर आधारित रिमोट मॉनिटरिंग यंत्रणेचे डिझाईन तयार केली. यातून रेल्वेतील पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत मिळेल. पाण्याची पातळी कमी झाल्यास पुढील पाणी भरणाऱ्या स्टेशनला त्याचा आपोआप मेसेज जाईल. सध्या ही यंत्रणा ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसच्या ११ डब्यांमध्ये बसवण्यात आली आहे, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

शौचालयाचे सीट कव्हर आपोआप उघडणार

रेल्वे गाड्यांमध्ये अनेक प्रसाधनगृहात सीट कव्हर न काढता लघूशंका करतात. त्यामुळे अन्य प्रवाशांच्या आरोग्यासाठी ते हानीकारक ठरते. यातून रेल्वेच्या एचएलबी व वंदे भारत डब्यात तंत्रज्ञानाचा वापर करून ही समस्या सोडवली आहे. यात ऑटोमॅटिक सीट कव्हरचा वापर केला आहे. जेव्हा प्रवाशाला प्रसाधनगृहाचा वापर करायचा असेल तेव्हा त्यावरील कव्हर ‘लिफ्ट अप पोझिशन’चे (वर करता येऊ शकेल) असेल. त्यानंतर ते सीट कव्हर पुन्हा जागच्या जागी बसेल, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in