राज्याचे पार्किंग धोरण लवकरच; एमएमआर क्षेत्रात प्राथमिक अंमलबजावणी होणार

वाहनांच्या पार्किंगची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीच्या कोंडीसारखी समस्या निर्माण होत आहे. भविष्याचा विचार करता लवकरच राज्यासाठी "एकात्मिक पार्किंग धोरण" आणण्याचा विचार परिवहन खाते करत असून त्याची प्राथमिक अंमलबजावणी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये (एमएमआर) करण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
राज्याचे पार्किंग धोरण लवकरच; एमएमआर क्षेत्रात प्राथमिक अंमलबजावणी होणार
Published on

मुंबई : वाहनांच्या पार्किंगची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीच्या कोंडीसारखी समस्या निर्माण होत आहे. भविष्याचा विचार करता लवकरच राज्यासाठी "एकात्मिक पार्किंग धोरण" आणण्याचा विचार परिवहन खाते करत असून त्याची प्राथमिक अंमलबजावणी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये (एमएमआर) करण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रातील महापालिका आयुक्तांच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. बैठकीला अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन) संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह एमएमआरडीएमधील महापालिका आयुक्त उपस्थित होते.

सरनाईक म्हणाले, एकात्मिक पार्किंग धोरण आणण्या अगोदर त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने कोणती त्रुटी राहू नये यासाठी ज्या महापालिका क्षेत्रामध्ये या समस्याने उग्र रूप धारण केले आहे, त्या महापालिका आयुक्तांच्या सूचना, अभिप्राय यांचा विचार होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच वाहनधारकाकडे स्वतःची पार्किंग व्यवस्था नसेल तर ते संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने उपलब्ध करून देणे गरजेचे असून त्यादृष्टीने महापालिका क्षेत्रामध्ये अशा पार्किंग जागा विकसित करण्याला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे.

राज्यासाठी पार्किंग धोरण तयार करत असताना सुरुवातीला मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये येणाऱ्या महापालिकांमध्ये प्रभावीपणे राबवावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचवले त्यानुसार ही बैठक बोलविण्यात आली होती. बैठकीमध्ये महापालिका क्षेत्रामध्ये पार्किंगच्या समस्येमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी सुचवलेल्या सूचना तसेच अभिप्राय यांचा पार्किंग धोरणामध्ये समावेश केला जाईल.

उद्यान, मैदानाखाली पार्किंग हवे

सरनाईक म्हणाले की, प्रत्येक महापालिकेने त्यांच्या उद्यान आणि मैदानाच्या खाली पार्किंगची व्यवस्था निर्माण होईल अशा पद्धतीने रचना करावी. ठाणे महापालिकेने मैदानाच्या खाली तयार केलेले वाहनतळ त्याचे उत्तम उदाहरण आहे. रस्त्यावरील अनाधिकृत पार्किंग हटवण्यासाठी पोलीस प्रशासन व मोटार परिवहन विभागाच्या मदतीने प्रभावी अंमलबजावणी करावी. रस्त्यावर अनेक वर्ष बंद असलेली वाहने तातडीने टोईंग करून हलवण्यात यावीत, रस्ते मोकळे करावेत. विकास आणि सुविधा साठी आरक्षित असलेल्या जागेवर पार्किंग प्लाझा उभारण्यात यावेत यासाठी मुंबई महापालिकेने उभारलेले पार्किंग प्लाझा धोरण इतर महापालिकांनी स्विकारावी जेणेकरून भविष्यात शहराची पार्किंग समस्या कमी होण्यास मदत होईल.

logo
marathi.freepressjournal.in