एसी लोकलबाबत स्टेशन मास्तर साधणार प्रवाशांशी संवाद

बदलापूर-सीएसएमटी-बदलापूर चार फेऱ्या, कल्याण-सीएसएमटी-कल्याण दोन फेऱ्या चालवण्यात आल्या
एसी लोकलबाबत स्टेशन मास्तर साधणार प्रवाशांशी संवाद
Published on

सी लोकलबाबत प्रवाशांचा संताप दिवसागणिक वाढत आहे. सामान्य लोकल फेऱ्या रद्द करत एसी लोकल चालविल्याने रेल्वे प्रशासनाविरोधात प्रवाशांची सातत्याने आंदोलने सुरू आहेत. ही बाब लक्षात घेत महत्त्वाच्या स्थानकातील प्रवासी, प्रवासी संघटना यांच्याशी स्थानकावर संवाद साधण्याच्या सूचना मध्य रेल्वेकडून स्थानकातील स्टेशन मास्तरांना देण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेकडून ठाणे ते सीएसएमटी ते ठाणे अप आणि डाउन मार्गावर एसी लोकलच्या चार फेऱ्या, बदलापूर-सीएसएमटी-बदलापूर चार फेऱ्या, कल्याण-सीएसएमटी-कल्याण दोन फेऱ्या चालवण्यात आल्या. सामान्य लोकल फेऱ्यांच्या बदल्यात वातानुकूलित लोकल सुरू केल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ लागली. बदलापूरमधील प्रवाशांनी रेल्वेच्या निर्णयाला तीव्र विरोध केला. कळव्यातही प्रवाशांनी आंदोलन केले. प्रवाशांचा विरोध आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलेला आंदोलनाचा इशारा पाहता मध्य रेल्वेने सुरू केलेल्या १० लोकल फेऱ्या तात्पुरत्या रद्द करण्याचा निर्णय घेतला; परंतु प्रवाशांकडून एसी लोकलला पूर्णता विरोध करण्यात येत असून एसी लोकलला विरोध का होत आहे? हे समजून घेण्यासाठी मध्य रेल्वेने स्थानिक प्रवासी, प्रवासी संघटना यांच्याशी स्टेशन मास्तरांमार्फत संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे.

१४ सप्टेंबरला बैठक

स्टेशन मास्तरांकडून बदलापूरमध्ये प्रवासी आणि प्रवासी संघटनाबरोबर सोमवारी १२ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता बैठक होणार होती. ही बैठक आता बुधवार, १४ सप्टेंबर रोजी होणार आहे. तसेच टिटवाळा, कल्याण, डोंबिवली, ठाणे या स्थानकातही बैठका होणार असून यावेळी नेमका विरोध का होत आहे? यावर प्रवाशांचे मत काय आहे? याबाबत संवाद साधला जाणार आहे

logo
marathi.freepressjournal.in