

मुंबई : वांद्रे पूर्व येथील गरीब नगरातील अनधिकृत झोपड्यांवर तोडक कारवाई करताना बुधवारी जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये तीन पोलीस जखमी झाले आहेत. दगडफेकीला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी जमावावर जोरदार लाठीचार्ज करत अनेकांना ताब्यात घेतले आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वांद्रे स्थानकालगत असलेल्या गरीब नगरमधील झोपड्यांवर कालपासून तोडक कारवाई करण्यात येत आहे. येथील ५०० अनधिकृत झोपड्या तोडण्यात येणार असून १०० अधिकृत झोपड्यांना संरक्षण देण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता अनधिकृत झोपड्या तोडण्याचे काम हाती घेण्यात आले. सुमारे १२०० कर्मचारी अविरतपणे या कारवाईत सहभागी झाले आहेत. आरपीएफचे २५०, जीआरपीचे २०० जवान, ५०० पोलीस आणि रेल्वेच्या विविध विभागातील अधिकारी यामध्ये सहभागी झाले आहेत.
बुधवारी करण्यात आलेल्या कारवाईत येथील मशीद जमीनदोस्त करण्यात आल्या. मशीद तोडण्याची कारवाई सुरू होताच जमावाने सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास पोलिसांवर दगडफेक केली. तरुणांनी जवळील बेहराम पाड्यातून पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. यावेळी पोलिसांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले.
झोपड्या तोडण्याचे ६० टक्के काम पूर्ण
कारवाई थांबेपर्यंत बुधवारी सुमारे ६० टक्के झोपड्यांवर बुलडोझर चालविण्यात आला. उर्वरित झोपड्या पुढील तीन दिवसात तोडण्याचे पश्चिम रेल्वेचे नियोजन - आहे. नागरिकांना पाणी, बिस्कीट वाटप करण्यात आले. तसेच दररोजच्या गरजेची सुविधा येथे पुरवण्यात आली आहे.
जमावाकडून 'अल्लाहू अकबर'च्या घोषणा
- मशिदीचे पाडकाम करतेवेळी जमावाने दगडफेक करत 'अल्लाहू अकबर'च्या घोषणा दिल्या. अनेक स्थानिक रहिवासी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत - होते. मात्र तरुणांनी विटा, पेव्हर ब्लॉक, दगड, चप्पल, कठीण वस्तू फेकण्यास - सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांनी शांतपणे परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बेहरामपाड्यात घुसून पोलिसांनी जमावावर लाठीमार केला.