रिक्षा-टॅक्सीवरील ऑनलाईन दंड आकारणी बंद करा!

मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियनची उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
रिक्षा-टॅक्सीवरील ऑनलाईन दंड आकारणी बंद करा!

वाहतुकीचे नियम पाळणे सर्वांनाच बंधनकारक आहे. मात्र बऱ्याचवेळा कोणतीही चूक नसताना वाहतूक पोलीस झटकन मोबाईलमध्ये फोटो काढून दंड आकारत असल्याची तक्रार मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियनने केली आहे. याबाबतचे लेखी पत्र बुधवार, २४ मे रोजी युनियन मार्फत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले असून चूक नसताना मोबाईलने फोटो काढून वाहतूक पोलिस शाखेकडून होणारी कारवाई तातडीने बंद करण्यात यावी तसेच आतापर्यंत आकारण्यात आलेले दंडाच्या रक्कमेत ७५% सुट देण्यात यावी, अशी मागणी युनियनमार्फत करण्यात आली आहे.

मुंबईसह महाराष्ट्रामध्ये वाहतूक पोलीस खात्याकडून काही काळापासून मोबाईलद्वारे फोटो काढून ऑटोरिक्षा-टॅक्सी तसेच इतर खासगी वाहनांवर त्यांच्या चालक मालकांवर दंड आकारले जात आहे. बहुतांश वेळा ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक-मालक यांची काहीही चूक नसताना सुड बुद्धीने व अन्य कारणांमुळे ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक-मालक यांना न कळता दंड आकारले जात असल्याचा आरोप युनियनकडून करण्यात आला आहे. बहुतांश ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक मालकांवर सद्यस्थितीत ५ हजार ते २० हजार यापेक्षा अधिक असे दंड वाहतूक पोलिसांकडून आकारल्याचे युनियनकडून सांगण्यात आले. मात्र हातावर पोट असलेले ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक-मालक यांच्यावर चुकीच्या पद्धतीने आकारण्यात येणाऱ्या या दंडांमुळे आज त्यांचा स्वयंरोजगार धोक्यात आलेला आहे. यामुळे ही कारवाई तात्काळ थांबवावी. तसेच आतापर्यंत आकारण्यात आलेल्या दंडाच्या रक्कमेत ७५% सुट देण्यात यावी जेणेकरून दंडाची रक्कम कमी झाल्यामुळे ऑटोरिक्षा टॅक्सी चालक-मालक ते भरू शकतील व त्यांचा स्वयंरोजगार धोक्यात येणार नाही, अशी मागणी मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियनने २४ मे रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ लेखी पत्राद्वारे केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in