वंदे भारतला कल्याण स्थानकात थांबा

सीएसएमटी ते शिर्डी आणि सीएसएमटी ते सोलापूर या दोन्ही गाड्यांचे नवे थांबे ४ ऑगस्टपासून सुरू
वंदे भारतला कल्याण स्थानकात थांबा

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सोलापूर आणि शिर्डीसाठी सुटणाऱ्या वंदे भारत ट्रेनला कल्याण स्थानकात थांबा देण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. सध्या या गाड्यांना मुंबई महानगर परिसरात दादर आणि ठाणे येथेच थांबा आहे. वंदे भारत आता कल्याणला थांबणार असल्याने या भागातील प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.

वंदे भारत गाडी क्रमांक २२२२३/२२२२४ ही सीएसएमटी स्थानकावरून शिर्डीसाठी निघाल्यानंतर सकाळी ७ वाजून १६ मिनिटांनी कल्याण स्थानकावर पोहोचेल, तर शिर्डीवरून येताना रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी कल्याण स्थानकात पोहोचेल. सध्या या गाडीला दादर, ठाणे, नाशिक रोड या ठिकाणी थांबा आहे. ही गाडी सीएसएमटीवरून सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी निघते आणि दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी शिर्डीला पोहोचते. तर शिर्डीवरून संध्याकाळी ५ वाजून २५ मिनिटांनी निघते आणि रात्री ११ वाजून १८ मिनिटांनी सीएसएमटी स्थानकात पोहोचते.

सीएसएमटी स्थानकावरून सोलापूरला जाणारी गाडी क्रमांक २२२२५/२२२२६ या गाडीला ठाणे स्थानकात थांबा दिला जाणार आहे. ही गाडी सीएसएमटी स्थानकावरून निघाल्यानंतर ठाणे स्थानकात दुपारी ४ वाजून ३३ मिनिटांनी पोहोचेल. तर सोलापूरवरून सीएसएमटी स्थानकाकडे येताना ही गाडी ठाणे स्थानकात रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. सध्या या गाडीला दादर, कल्याण, पुणे, कुर्डुवाडी येथे थांबा आहे. ही गाडी सीएसएमटी स्थानकावरून दुपारी ४ वाजून ०५ मिनिटांनी निघते आणि सोलापूरला रात्री १० वाजून ४० मिनिटांनी पोहोचते. तर सोलापूरवरून सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी निघून सीएसएमटी स्थानकात दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी पोहोचते. सीएसएमटी ते शिर्डी आणि सीएसएमटी ते सोलापूर या दोन्ही गाड्यांचे नवे थांबे ४ ऑगस्टपासून सुरू होणार आहेत, असे मध्य रेल्वेने आपल्या पत्रकात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in