'ड्रंक अँड ड्राईव्ह'चे प्रकार रोखण्यासाठी कठोर कारवाई! रात्री उशिरा पब, रेस्टॉरंट, बार सुरू असल्यास परवाना रद्द

ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा रात्री उशिरापर्यंत पब, रेस्टॉरंट, बार सुरू असल्याचे निदर्शनास आले तर त्या पब, रेस्टॉरंट, बारचा परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
'ड्रंक अँड ड्राईव्ह'चे प्रकार रोखण्यासाठी कठोर कारवाई! रात्री उशिरा पब, रेस्टॉरंट, बार सुरू असल्यास परवाना रद्द

मुंबई : 'ड्रंक अँड ड्राईव्ह' घटना रोखण्यासाठी आता आणखी कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा रात्री उशिरापर्यंत पब, रेस्टॉरंट, बार सुरू असल्याचे निदर्शनास आले तर त्या पब, रेस्टॉरंट, बारचा परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. दरम्यान, रस्ते, चौक, वर्दळीची प्रमुख ठिकाणे यासह नाक्या- नाक्यांवर वाहनचालकांची तपासणी करून 'ड्रंक अँड ड्राईव्ह' प्रकरणी कडक कारवाई करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी संबंधितांना दिली. दरम्यान, मुंबईत बरसलेल्या पावसाचा अंदाज घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी पालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट दिली, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते म्हणाले की, रात्रीच्या वेळेस तसेच विकेंडच्या दिवशी तपासण्यांचे प्रमाण वाढविण्यात यावे. मद्यसेवन करून वाहने चालविणाऱ्या चालकांवर कडक कारवाई करून दंडाची वसुली करण्यात यावी. त्याचबरोबर नियमाचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात यावी. अशा 'हॅबिच्युअल' वाहनचालकांचे लायसन्स रद्द करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

नियमित तपासणी करण्याच्या सूचना

मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासनाने शहरातील पब्ज, बार आणि रेस्टॉरंट्सची नियमित तपासणी करावी. पब्ज, बार, रेस्टॉरंट चालू ठेवण्याच्या वेळा, ध्वनी प्रदूषण रोखण्याचे नियम, आवश्यक परवाने यासंदर्भात वेळोवेळी तपासण्या करण्यात याव्यात. रात्री उशिरा चालू राहणारे बार, पब्ज आणि रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात यावी, त्यांचे लायसन्स रद्द करण्यात यावेत. महापालिका आणि पोलीस प्रशासनाने यासाठी समन्वयाने काम करावे, अशा सूचना शिंदे यांनी दिल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in