मुंबईतील खड्डेमुक्त रस्त्यांसाठी आटापिटा; ३,८०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण होते. रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतात
मुंबईतील खड्डेमुक्त रस्त्यांसाठी आटापिटा; ३,८०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार
Published on

मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवण्यावर भर दिला जात आहे. पश्चिम उपनगरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवण्यात येणार असून, या कामासाठी तब्बल ३,८०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे रस्ते विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण होते. रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतात; मात्र पहिल्याच पावसात रस्ते खड्डेमय होत असल्याने पालिकेला मुंबईकरांच्या रोषाला सामोरे जावे लागते. त्यामुळे मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रीटचे बनवण्यात येत असून पुढील दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होतील, असा विश्वास पालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांनी व्यक्त केला आहे. टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रीटचे रस्ते होत असून, पुढील दोन वर्षात पश्चिम उपनगरातील नऊ प्रभागांत तब्बल तीन हजार ८०० कोटी रुपये खर्चून सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सिमेंटच्या रस्त्यांमुळे पश्चिम उपनगरातील नागरिकांना खड्ड्यांच्या समस्येपासून मोठा दिलासा मिळणार आहे. अशाच पद्धतीने सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची कामे शहर व पूर्व उपनगरात करण्यात येणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in