मुंबई : एसटी महामंडळाने ताफ्यात वातानुकूलित मिनी बसगाड्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. घाट चढण्यात उपयुक्त, पर्यावरणपूरक अशा २० विद्युत बसेस लवकरच प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर धावणार आहेत. या बस ठाणे-१ आगारामार्फत ठाणे-नाशिक, बोरिवली-नाशिकदरम्यान लवकरच सुरू होणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. दरम्यान, वातानुकूलित इलेक्ट्रिक बस एकदा चार्ज केल्यानंतर २०० किमी सुसाट धावणार आहे.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या १४ हजार ६० बसेस आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचवण्याची जबाबदारी एसटीचे चालक व वाहक पार पाडतात. परंतु घाट चढण्यात अनेक वेळा एसटीच्या मोठ्या गाड्या कमी पडतात. आतापर्यंत एसटीच्या ताफ्यात डिझेल बसगाड्या होत्या. मात्र आता एसटी महामंडळाने इलेक्ट्रिक बसेस घेण्यास प्राधान्य दिले असून ९ मीटरच्या २ हजार ३०० मिनी बसगाड्या व १२ मीटरच्या मोठ्या २ हजार ८५० गाड्या घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी १०० मोठ्या बसेस दाखल झाल्या असून त्या दादर-पुणे, बोरिवली-पुणे तसेच ठाणे-पुणे या मार्गावर धावत आहेत तर ९ मीटरच्या २ हजार ३०० मिनी बसेसपैकी पहिल्या २० बसेस एसटीच्या ताफ्यात ठाणे-१ आगारात दाखल झाल्या आहेत. या बसगाड्यात ३५ आरामदायक आसने असून लवकरच या २० मिनी बसेस पुढील दोन-चार दिवसात प्रवासी सेवेत रस्त्यावर धावतील, असे एसटीकडून सांगण्यात आले.