आजोबा, टेस्ला कार नको, एसटी पास मोफत द्या…! मोफत प्रवासासाठी छात्र भारतीचे खुले पत्र

नातवाला शाळेत जाण्यासाठी भारतातील पहिली टेस्ला कार परिवहन मंत्र्यांनी नातवाला गिफ्ट दिली आहे. आम्हाला टेस्ला कार नको, शाळेत जायला एसटी पास मोफत द्या, या मागणीचे खुले पत्र छात्र भारतीने परिवहन मंत्र्यांना पाठवले आहे.
आजोबा, टेस्ला कार नको, एसटी पास मोफत द्या…! मोफत प्रवासासाठी छात्र भारतीचे खुले पत्र
Published on

मुंबई : नातवाला शाळेत जाण्यासाठी भारतातील पहिली टेस्ला कार परिवहन मंत्र्यांनी नातवाला गिफ्ट दिली आहे. आम्हाला टेस्ला कार नको, शाळेत जायला एसटी पास मोफत द्या, या मागणीचे खुले पत्र छात्र भारतीने परिवहन मंत्र्यांना पाठवले आहे.

राज्यातील ग्रामीण व शेतकरी कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शाळा–महाविद्यालयात पोहोचण्यासाठी एसटी बस हा एकमेव आधार आहे.

तरीदेखील विद्यार्थ्यांच्या एस.टी. पासबाबत होणारी दिरंगाई, अपमानास्पद वागणूक आणि पास संपल्यामुळे विद्यार्थ्यांना बसमधून उतरविण्याच्या घटनांमुळे अनेक ठिकाणी विद्यार्थी मानसिक त्रासाला सामोरे जात आहेत.

चोपडा तालुक्यातील उनपदेव–अडावद मार्गावर १९ ऑगस्ट २०२५ रोजी पाचवीतील आदिवासी विद्यार्थी बादल राजाराम बारेला याला पास संपल्याने भर पावसात एस.टी.मधून खाली उतरवण्यात आले.

दोन ते तीन किलोमीटर पायी चालत तो मुलगा घरी पोहोचला. २० दिवस झालेत आजपर्यंत संबंधित वाहकावर कुठलीही कारवाई झाली नसल्याचे छात्र भारती संघटनेने पत्रात म्हंटले आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या नातवाला शाळेत जाण्यासाठी भारतातील पहिली टेस्ला कार गिफ्ट दिली आहे. आम्हालाही आजोबांचे प्रेम समजते.

मात्र, आपल्या नातवाप्रमाणेच ग्रामीण, आदिवासी व शेतकरी कुटुंबातील लाखो विद्यार्थ्यांचीही दररोज शाळेत पोहोचण्याची जबाबदारी परिवहन मंत्र्यांची आहे.

त्यानुसार राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना एस.टी. पास मोफत द्यावा. तसेच प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक देऊ नये, यासाठी आदेश जारी करावेत,अशी मागणीही छात्र भारती या संघटनेने पत्रकाद्वारे केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in