
मुंबई महापालिकेच्या शाळांत येणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. ज्या विद्यार्थ्यांस शिक्षणाची आवड असून १०वी उत्तीर्ण झाल्यानंतर मेडिकल, इंजिनीअर अभ्यासक्रमाची आवड व शिक्षण घेण्याची जिद्द असल्यास त्या विद्यार्थ्याची फी मुंबई महापालिका भरणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणात गोडी निर्माण होईल आणि अन्य विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे हा मुख्य उद्देश असल्याचे पालिकेच्या शिक्षण विभागाचे सह आयुक्त अजित कुंभार यांनी सांगितले. दरम्यान, आतापर्यंत २५ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाल्याने त्यांनी सांगितले.
मुंबई महापालिका शाळांत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती बेताचीच असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तू मोफत वाटप करण्यात येतात. तसेच मैदानी खेळात आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार मैदाने तयार करण्यात येत आहेत. तसेच मोफत ‘बेस्ट’ प्रवास, डिजिटल क्लासरूम, टॅब यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी पालिका शाळेतील शिक्षण महत्त्वपूर्ण ठरत आहे. या पार्श्वभूमीवर आता दहावीच्या परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या २५ विद्यार्थ्यांना करिअर घडवण्यासाठी उच्चशिक्षण घेत असल्यास त्यांची फी पालिका भरणार असल्याचे ते म्हणाले.
या योजनेची अंमलबजावणी २०२०पासून करण्यास सुरुवात झाली असून २०२१मध्ये १२वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाल्याचे कुंभार यांनी सांगितले.