व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांची पाठ; प्रवेश अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस, मुदतवाढीची विद्यार्थी व पालकांकडून मागणी

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून राबविण्यात येणाऱ्या काही व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांची पाठ; प्रवेश अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस, मुदतवाढीची विद्यार्थी व पालकांकडून मागणी
Published on

तेजस वाघमारे/ मुंबई

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून राबविण्यात येणाऱ्या काही व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. एम.ई/एम.टेक, बी.डिझाईन, बी.फार्मसी, एम.आर्च, बी.एड, बी.एड- एम.एड एकात्मिक, एम.एड या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज नोंदणी करण्याची अंतिम मुदत २० जुलै आहे; मात्र या अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा दिलेल्या निम्म्या विद्यार्थ्यांनीही अद्यापपर्यंत प्रवेशासाठी नोंदणी केली नाही.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून सात व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज नाेंदणी सुरू आहे. या अभ्यासक्रमांसाठी अर्ज भरण्याची मुदत २० जुलै आहे. असे असतानाही विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी हजारो विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत शुल्क भरून अर्ज अंतिम केलेले नाहीत. त्यामुळे या अभ्यासक्रमांच्या अर्ज नोंदणीबरोबरच शुल्क भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणीहोऊ लागली आहे.

सीईटी कक्षाकडून काही व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. यातील एम.ई/एम.टेक, बी.डिझाईन, बी.फार्मसी, एम.आर्च, बी.एड, बी.एड- एम.एड एकात्मिक, एम.एड या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत २० जुलै आहे. या अभ्यासक्रमाच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी निम्म्या विद्यार्थ्यांनीही अद्यापपर्यंत प्रवेशासाठी नोंदणी केलेली नाही. तसेच नोंदणी केलेल्या विद्यार्थांपैकी अनेक विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्जही निश्चित केलेला नाही.

बी.एड अभ्याक्रमाच्या प्रवेशासाठी ७२ हजार ३७८ विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली होती. त्यापैकी केवळ ३१ हजार ८६९ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केला असून २२ हजार ९१७ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केला आहे. तसेच एम.आर्च अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ८४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील ३६१ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली असून २०८ विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित केला आहे. एम.एड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २ हजार ६१७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १ हजार ३६३ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली असून १ हजार ८० विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित केले आहेत.

अभ्यासक्रम नोंदणी निश्चित अर्ज

एम.ई/एम.टेक ७४५९ ४२७३

बी.डिझाईन १८७ ९७

बी.फार्मसी २५७ ४

एम.आर्च ३६१ २०८

बी.एड ३१८६९ २२९१७

बी.एड एम.एड एकात्मिक २६३ १५७

एम.एड १३६३ १०८०

logo
marathi.freepressjournal.in