कोरोनाकाळ ज्याप्रमाणे नोकरदारांना त्रासदायक झाला. त्याचप्रमाणे ऑनलाइन-ऑफलाइनच्या गोंधळात विद्यार्थ्यांच्या अडचणीत भर पडली आणि सर्व जण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान आणि गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले. त्यामुळे आता महानगरपालिकेचा शिक्षण विभाग विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता चाचणी करणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि अचानक शाळा ऑनलाइन करण्यात आल्या. विद्यार्थ्यांना सवय नसल्याने त्याचा पालकांनाही त्रास झाला. त्यानंतरची दीड वर्षे तशीच गेली. तिसऱ्या लाटेतील लॉकडाऊन काळात काही व्यवहार ऑनलाइन सुरू झाल्यानंतर शिक्षणही ऑनलाइन सुरू झाले; मात्र सुरुवातीला या ऑनलाइन शिक्षणात अनेक अडचणी निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. हे शैक्षणिक नुकसान नेमके कोणत्या प्रकारचे आहे. त्याचा विद्यार्थ्यांवर नेमका काय परिणाम झाला, याचा अभ्यास करण्याचा निर्णय शिक्षण विभाग करणार आहे.
पालिका शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी एक अभ्यासक्रम विकसित करण्यात येत आहे. यामध्ये इंग्रजी, गणित, विज्ञान यासह महत्त्वाच्या विषयांवर अधिक भर देण्यात येणार असून, या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची चाचणी होईल. संबंधित विषयाच्या तज्ज्ञांच्या मदतीने प्रश्नसंच तयार करून विद्यार्थ्यांना त्याबद्दल सर्वसाधारण किती माहिती आहे, याचा अंदाज घेतला जाईल. यामुळे विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत येत नसल्याने विद्यार्थ्यांचे नेमके काय नुकसान झाले याची माहितीही घेतली जाईल, असे पालिका सह आयुक्त (शिक्षण विभाग) अजित कुंभार यांनी सांगितले.