
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांत ज्ञानाचे धडे गिरविणाऱ्या विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळावे, यासाठी आता आणखी एक पाऊल उचलण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक कार्य करणारी बायजूस संस्था व बृहन्मुंबई महानगरपालिकेचा शिक्षण विभाग यांच्यात करण्यात आलेला सामंजस्य करार. दावोस (स्वित्झर्लंड) येथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेत झालेल्या या करारामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना बाजूस संस्थेचे ‘लर्निंग अॅप’ व इतर सेवा प्रणाली या विनामूल्य वापरासाठी उपलब्ध होणार आहेत.
महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग आणि खनिकर्म खात्याचे मंत्री सुभाष देसाई, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष सिंह आणि बायजूस संस्थेचे बायजू रविंद्रन हे दावोसमध्ये प्रत्यक्ष उपस्थित होते, तर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, सह आयुक्त (शिक्षण) अजित कुंभार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते, असे पालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी व्हर्च्युअल क्लासरूम, डिजिटल क्लासरूम, टॅब, कम्प्युटर लॅब, सायन्स लॅब, अॅस्ट्रॉनॉमी लॅब, संगीत- कला- क्रीडा अशा विविध उपक्रमाद्वारे अध्ययन व अध्यापन करण्यात येते.