पावसाळ्यासाठी विद्यार्थ्यांना छत्री मिळणार; पालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तरतूद

मुंबई मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना यंदा पावसाळ्यापूर्वी छत्रीचा आसरा मिळणार आहे.
पावसाळ्यासाठी विद्यार्थ्यांना छत्री मिळणार; पालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तरतूद

मुंबई : मुंबई मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना यंदा पावसाळ्यापूर्वी छत्रीचा आसरा मिळणार आहे. सन २०२४-२५ व २०२५-२६ या दोन वर्षांसाठी छत्री खरेदीचा निर्णय पालिकेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात १ कोटी ९१ लाख ५४ हजार ३०४ रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.

मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येतात. पालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून ८ भाषांतून शिक्षण दिले जाते. दप्तर, वह्या, पुस्तक, बुट, गणवेश, पाण्याची बाटली आदी २७ शालेय वस्तूंचे मोफत वाटप करण्यात येते. दरवर्षी, शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप होते, अशी टीका पालिकेच्या शिक्षण विभागावर होते. त्यामुळे यंदा आतापासूनच शालेय वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी शिक्षण विभागाने नियोजन आखले आहे. यात पुस्तक, बूट, गणवेश, पाण्याच्या बाटल्यांसाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. परंतु पावसाळ्यापूर्वी विद्यार्थ्यांना छत्रीचे वाटप केल्यास विद्यार्थ्यांना पावसाळी दिलासा मिळेल, असा विश्वास पालिकेच्या शिक्षण विभागाने व्यक्त केला.

शालेय वस्तूंचे वाटप वेळेवर होत नसल्याने दरवर्षी पालिकेच्या शिक्षण विभागावर टीकेची तोफ डागली जाते. त्यामुळे शिक्षण विभाग आतापासून कामाला लागला असून २०२४-२५ आणि २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांसाठी विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यासाठी शालेय वस्तू खरेदीचा निर्णय घेतला आहे. यासाठी निविदा मागवण्यात आल्या असून १ कोटी ९१ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पालिका शाळांत विविध माध्यमातील चार लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

१६२ कोटींची तरतूद

दरम्यान, शालेय उपयोगी २७ प्रकारच्या वस्तूंचा दोन वर्षांसाठी मोफत पुरवठा करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १६२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in