विद्यार्थ्यांना यंदा मिळणार पाण्याची बॉटल, दप्तर ; रोख रक्कम न देण्याचा पालिकेचा निर्णय

मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तूंचे वाटप करण्याचा निर्णय २००७ मध्ये घेण्यात आल्यानंतर तेव्हापासून मुलांना या वस्तूंचे वाटप केले जात आहे
विद्यार्थ्यांना यंदा मिळणार पाण्याची बॉटल, दप्तर ; रोख रक्कम न देण्याचा पालिकेचा निर्णय

गेल्या वर्षी प्रस्ताव उशीरा मंजूर झाल्याने विद्यार्थ्यांना दप्तर, पाण्याची बॉटल, खाऊचा डबा देण्याऐवजी रोख पैसे देण्यात आले होते. मात्र यंदा रोख रक्कम न देता दप्तर, वॉटर बॉटल व खाऊचा डबा देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मुलांना २९० ते ४४४ रुपयांपर्यंतचे दप्तर तर १९३ ते २९६ रुपयांपर्यंत खाऊचा डबा आणि पाण्याची बाटली दिली जाणार आहे.

मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तूंचे वाटप करण्याचा निर्णय २००७ मध्ये घेण्यात आल्यानंतर तेव्हापासून मुलांना या वस्तूंचे वाटप केले जात आहे. परंतु मागील वर्षी निविदा प्रक्रियेला विलंब झाल्याने या शालेय वस्तूंच्या खरेदीचा प्रस्ताव १७ जून २०२२ पासून मंजूर करण्यात आला. त्यामुळे मुलांना शालेय साहित्य मिळण्यास विलंब झाला होता. मुलांना छत्रीसह दप्तर, पाण्याची बॉटल व खाऊचा डबा आदी वस्तू न देता त्यासाठीचे पैसे मुख्याध्यापकांमार्फत मुलांना वाटप करून या वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या; मात्र २०२२ - २३ व २०२३ - २४ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्याचे कंत्राट दोन वर्षांसाठी देण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षांत विद्यार्थ्यांना रोख रक्कम न देता दप्तर वॉटर बॉटल व खाऊचा डबा देण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाचे सहआयुक्त अजित कुंभार यांनी सांगितले.

वस्तूंच्या खरेदीसाठी २० कोटी खर्च

यावर्षी या वस्तूंच्या वाटपासाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पूर्व प्राथमिक ते दुसरी इयत्तापर्यंतच्या मुलांसाठी या वस्तूंच्या खर्चासाठी प्रत्येकी ४८३. ६२ रुपये खर्च केले जाणार आहे, तर इयत्ता तिसरी ते सातवीपर्यंतच्या मुलांसाठी प्रत्येकी ६१५ रुपये, तर इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतच्या मुलांसाठी प्रत्येकी प्रत्येकी ७४० रुपये एवढा खर्च या वस्तूंच्या खरेदीसाठी येणार आहे. या वस्तूंच्या पुरवठ्यासाठी सर्वस्य मर्चडायझर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी निविदेत पात्र ठरली असून, या वस्तूंच्या खरेदीसाठी २० कोटी ०३ लाख रुपये खर्च केले जाणार आहे.

मुलांच्या वस्तूंसाठी होणारा खर्च

-पूर्व प्राथमिक ते दुसरी इयत्ता( एकूण मुले १, १२,९२८) : खर्च प्रत्येकी ४८३. ०२ रुपये

-इयत्ता तिसरी ते सातवी ( एकूण मुले १, ७३,७५५): खर्च प्रत्येकी ६१५ रुपये

-इयत्ता आठवी ते दहावी( एकूण मुले ७४,२५३) : खर्च प्रत्येकी ७४० रुपये

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in