स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी 'इंदूर पॅटर्न'! घनकचरा व्यवस्थापनाचा दोन दिवस दौरा, 'या' गोष्टींचा अभ्यास करणार

स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी 'इंदूर पॅटर्न'! घनकचरा व्यवस्थापनाचा दोन दिवस दौरा, 'या' गोष्टींचा अभ्यास करणार

कचरा संकलन, कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प, स्वच्छतेत सफाई कामगारांची भूमिका काय याचा अभ्यास करण्यासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी दोन दिवसीय इंदूरला जाणार आहेत.

मुंबई : स्वच्छतेत इंदूर शहराने अनेक वेळा प्रथम क्रमांक पटकावला आहे. कचरा संकलन, कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प, स्वच्छतेत सफाई कामगारांची भूमिका काय याचा अभ्यास करण्यासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी दोन दिवसीय इंदूरला जाणार आहेत. स्वच्छतेत मुंबई टाॅप टेनमध्ये येण्यासाठी ‘इंदूर पॅटर्न’ राबवण्यात येणार आहे.

मुंबई अजून स्वच्छ, सुंदर व हरित बनवण्यासह देशात प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर बनवण्यासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने कंबर कसली आहे. पालिका घनकचरा व‍यवस्थापन विभागातील कनिष्ठ पर्यवेक्षक आणि अभियंता यांच्या इंदूर शहर पाहणी अभ्यास भेटीचे आयोजन करण्यात आले आहे. फेब्रुवारी / मार्च २०२४ मध्ये आयोजित दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यात घरोघरी १०० टक्के कचरा संकलन, ओला-सुका कचरा वर्गीकरण, वाहतूक नियोजन, कचरा विल्हेवाटीचे सुयोग्य नियोजन तसेच सार्वजनिक स्वच्छता याचा अभ्यास करणार आहेत. महाराष्ट्र सरकारची शैक्षणिक संस्था म्हणून मान्यताप्राप्त असलेल्या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांची अभ्यास भेटीचे आयोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे.

पालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) (अतिरिक्त कार्यभार) संजोग कबरे यांच्या नेतृत्वाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कामकाज सुरू आहे. मुंबईत दररोज सरासरी ६ हजार ३०० मेट्रिक टन कचऱ्यावर कांजूरमार्ग व देवनार डम्पिंग ग्राऊंडवर ७५० ते ८०० मेट्रिक टन राडारोड्याची देवनार क्षेपणभूमी येथे विल्हेवाट लावण्यात येते. ९४९ सामुदायिक कचरा संकलन केंद्र आणि ४७ सुका कचऱ्याचे वर्गीकरण केंद्र येथे घनकचऱ्याचे संकलन आणि वर्गीकरण केले जाते.

कनिष्ठ पर्यवेक्षकाचे योगदान महत्त्वपूर्ण

स्वच्छ भारत मिशन २.० च्या मार्गदर्शक तत्त्वांशी सुसंगत क्षमता बांधणी उपक्रम राबवून स्वच्छ, हरित आणि अधिक शाश्वत मुंबईचा दृष्टीकोन साध्य करण्याच्या दिशेने प्रयत्नशील आहे. प्राथमिक स्तरावर काम करणारे सफाई कामगार व कनिष्ठ आवेक्षक हे कचरा संकलन यंत्रणेचा महत्त्वपूर्ण भाग आहेत. त्यांचे योगदान आणि कौशल्याचा थेट परिणाम कचरा संकलनाच्या कार्यक्षमतेवर आणि शहर स्वच्छतेवर होतो. कचरा संकलन यंत्रणेचे सुरळीत कार्य सुनिश्चित करण्यात, शहराची स्वच्छता तसेच शहर सौंदर्य राखण्यात स्वच्छता कर्मचाऱ्यांचे विशेषतः कनिष्ठ पर्यवेक्षकाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

या गोष्टींचा अभ्यास करणार !

इंदूर अभ्यास भेटीमध्ये दैनंदिन कचरा संकलन, कचरा हाताळणी, विलगीकरणाची आव्हाने, कचरा प्रक्रिया प्रकल्प, कचरा समस्यासाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजना, सफाई कामगारांची भूमिका, कचरा हाताळताना सुरक्षितता, सामुदायिक सहभाग आणि इंदूरच्या यशस्वी कचरा व्यवस्थापन प्रणालीतून मिळालेल्या इतर महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in