सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांचा पत्ता कट होणार ?

सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांचा पत्ता कट होणार ?

राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात जोरदार चुरस सुरू असतानाच विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला मतदान होणार आहे. निवडणूक जाहीर होताच भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेकडून विधान परिषदेच्या दोन जागांसाठी माजी मंत्री सचिन अहिर आणि नंदुरबारचे जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांचा पत्ता कट होणार, हे जवळपास निश्चित आहे. राष्ट्रवादीकडून सभापती रामराजे निंबाळकर आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे पुनर्वसन होण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसमधून भाई जगताप, नसीम खान, सचिन सावंत, बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे यांची नावे दिल्लीला पाठवल्याचे समजते. भाजपकडून प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार आहे. पंकजा मुंडे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, कृपाशंकर सिंह यातून दोन नावे निश्चित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

येत्या २० जून रोजी होत असलेल्या परिषदेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी (ता.९) उमेदवारी दाखल करण्याचा अंतिम दिवस असल्याने चारही पक्षांकडून नावे निश्चित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लॉबिंग सुरू आहे. या १० जागा विधानसभेतील सदस्यांकडून निवडून द्यायच्या आहेत. विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या आघाडीच्या प्रत्येक पक्षाला दोन जागा मिळतील. भाजपच्या चार जागा सहज निवडून येऊ शकतात. एका उमेदवाराला जिंकण्यासाठी २७ मतांचा कोटा आहे. शिवसेना ५५, राष्ट्रवादी ५३ तर काँग्रेसकडे ४४ मते आहेत. भाजपकडे १०६चे संख्याबळ आहे. राज्यसभेला मदत केल्याच्या मोबदल्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला मदत करेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे तिन्ही पक्ष प्रत्येकी दोन जागा लढविणार आहेत.

भाजपमधून कोणाला संधी?

चार जागांसाठी भाजपमधून अनेक जण इच्छुक आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, कृपाशंकर सिंह, पंकजा मुंडे, राम शिंदे, सदाभाऊ खोत, श्रीकांत भारतीय आदींची नावे दिल्लीत पाठविण्यात आल्याची माहिती आहे. त्यातील प्रवीण दरेकर आणि कृपाशंकर यांची नावे मुंबईतून निश्चित करण्यात आल्याचे कळते. कृपाशंकर यांना संधी देऊन उत्तर भारतीयांना चुचकारण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पंकजा मुंडे किंवा राम शिंदे या दोन ओबीसी माजी मंत्र्यांपैकी एकाला संधी मिळू शकते. चौथ्या जागेसाठी प्रसाद लाड, सदाभाऊ खोत आणि श्रीकांत भारतीय यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. लाड यांचे पारडे जड मानले जाते.

निवृत्त होणारे आमदार :

भाजप - सहा : प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, सुजितसिंह ठाकूर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे. रामनिवास सत्यनारायण सिंह यांचे निधन. शिवसेना - दोन : सुभाष देसाई, दिवाकर रावते. राष्ट्रवादी - दोन : रामराजे नाईक निंबाळकर, संजय दौंड.

निवडणुकीचा कार्यक्रम

-उमेदवारी अर्जाचा शेवटचा दिवस – ९ जून २०२२

अर्जांची छाननी – १० जून २०२२

अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस – १३ जून २०२२

मतदानाचा दिवस – २० जून २०२२

मतमोजणीचा दिवस – २० जून २०२२ (सायंकाळी ५ वाजता)

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in