सुबोधकुमार जयस्वाल यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती

निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रकुमार त्रिवेदी यांनी जनहित याचिकेद्वारे जयस्वाल यांच्या नियुक्तीला आव्हान दिले
सुबोधकुमार जयस्वाल यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती

सीबीआय’चे विद्यमान संचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या नियुक्तीला आव्हान देणारे प्रकरण ऐकण्यापासून मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी गुरुवारी स्वतःला दूर ठेवले. याचिकाकर्त्याने आपल्याविरोधात सरन्यायाधीशांकडे तक्रार केल्याने आपण हे प्रकरण ऐकू शकत नसल्याचे मुख्य न्यायमूर्तींनी स्पष्ट केले.

निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रकुमार त्रिवेदी यांनी जनहित याचिकेद्वारे जयस्वाल यांच्या नियुक्तीला आव्हान दिले आहे. हे प्रकरण गुरुवारी सुनावणीसाठी आले असता आपण ते ऐकू शकत नसल्याचे मुख्य न्यायमूर्ती दत्ता यांनी म्हटले. या प्रकरणातील याचिकाकर्ते त्रिवेदी यांनी आपल्याविरोधात सरन्यायाधीशांकडे तक्रार केली आहे. आम्ही हे प्रकरण अन्य खंडपीठाकडे वर्ग करीत आहोत, असे न्यायमूर्तींनी स्पष्ट केले.

त्यावर आपल्या अशिलाने ही तक्रार केलेली नाही. कोणी तरी त्यांच्या नावाचा वापर करून ही तक्रार केली असावी, असा दावा त्रिवेदी यांचे वकील सतीश तळेकर यांनी केला. आपण ही तक्रार केली नसल्याचे त्रिवेदी प्रतिज्ञापत्रावर लिहून देण्यास तयार असल्याचेही तळेकर यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर तुमच्या अशिलाने याप्रकरणी नाही; पण अन्य प्रकरणात तक्रार केली असावी; परंतु आपल्याविरोधात तक्रार केल्याने आपण हे प्रकरण ऐकू शकत नसल्याचा पुनरुच्चार करून मुख्य न्यायमूर्तीं दत्ता यांनी प्रकरणापासून स्वतःला दूर ठेवले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in