मुंबई : फोन काढताना खिशातून गहाळ झालेले सुमारे ३० लाखांचे हिरे परत मिळविण्यात एल. टी मार्ग पोलिसांना यश आले आहे. ते हिरे संबंधित हिरे व्यापाऱ्याला परत करण्यात आले आहेत. साहेब राजेंद्रकुमार जैन हे हिरे व्यापारी मंगळवारी झव्हेरी बाजार येथील मित्राच्या दुकानात जात असताना फोन काढताना त्यांच्या खिशातून ३० लाखांचे हिरे पडले होते. या प्रकरणी त्यांनी एल. टी. मार्ग पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी एका व्यक्तीला पोलीस ठाण्यात बोलावल्यानंतर त्याने हे हिरे पोलिसांच्या स्वाधीन केले. अवघ्या काही तासांत गहाळ झालेले हिरे सापडल्याने त्यांनी पोलीस पथकाचे आभार व्यक्त केले.