सव्वा महिन्यांत २५ हजार नवे विद्यार्थी ‘मिशन अॅडमिशन’ची यशस्वी वाटचाल; जुलैपर्यंत मोहीम राबवणार

विद्यार्थी व पालकांची वाढती पसंती लक्षात घेता मिशन अँडमिशन मोहीम जुलैपर्यंत राबवणार असल्याचे पालिकेच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले
सव्वा महिन्यांत २५ हजार नवे विद्यार्थी ‘मिशन अॅडमिशन’ची यशस्वी वाटचाल; जुलैपर्यंत मोहीम राबवणार

मुंबई महापालिका शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढावा यासाठी शिक्षण विभागाने ‘मिशन अॅडमिशन’ मोहीम हाती घेतली आहे. एप्रिल महिन्यापासून सुरू झालेल्या या मोहिमेला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून सव्वा महिन्यांत तब्बल २५ हजार विद्यार्थ्यांनी नवीन प्रवेश घेतला आहे. विद्यार्थी व पालकांची वाढती पसंती लक्षात घेता मिशन अँडमिशन मोहीम जुलैपर्यंत राबवणार असल्याचे पालिकेच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये सद्यस्थितीत ४ लाख ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पालिका शाळेत येणारी विद्यार्थी दुर्बल घटकातील असल्याने आर्थिक परिस्थिती बेताची असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तूंचे मोफत वाटप करण्यात येते. बस सेवा मोफत, व्हर्च्युअल क्लासची सुविधा अशा विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मात्र पालकांचा कल इंग्रजी माध्यमांकडे असल्याने पालिका शाळांतील विद्यार्थी संख्या कमी होत आहे. पालिका शाळांमध्ये आपल्या मुलाने शिक्षण घ्यावे यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने सीबीएसईच्या शाळा सुरू केल्या असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच विद्यार्थी संख्या वाढीसाठी गेल्या शैक्षणिक वर्षांपासून मिशन अॅडमिशन मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या राबवण्यात आलेल्या मिशन अॅडमिशन मोहिमेत सव्वा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यंदाही मिशन अॅडमिशम मोहीम एप्रिलपासून हाती घेतली असून आतापर्यंत २५ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, तमीळ, तेलुगू, कन्नड आणि गुजराती अशा आठ प्रकारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. मुंबई महानगरपालिका शाळांचे नामकरण आता ‘मुंबई पब्लिक स्कूल’ असे करण्यात आले आहे.

क्युआर कोड स्कॅन करून अॅडमिशन

पालिकेच्या शिक्षण विभागातील शिक्षक, कर्मचारी, अधिकारी यांच्या व्हॉट्सअ‍ॅप डीपीवरील क्युआर कोड स्कॅन करून यामध्ये पाल्याचे नाव, पालकांचा मोबाईल क्रमांक, हव्या असलेल्या प्रवेशाचे ठिकाण, प्रवेशाची इयत्ता, प्रवेशाचे माध्यम इत्यादी तपशील भरल्यास शिक्षण विभागाकडून पाठपुरावा करून प्रवेश निश्चित केला जात आहे. शिवाय http://bit.ly/BMC_MISSITION_ADMISSION_2023-24 या लिंकवर पालकांना पालिका शाळेत प्रवेश घेता येईल.

पालिकेची शैक्षणिक स्थिती

नर्सरी ते १०वी पर्यंतच्या एकूण शाळा - ११५०

शाळांच्या एकूण इमारती - ४५०

सध्याची विद्यार्थीसंख्या - ४ लाख ५० हजारांवर

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in