‘मेट्रो-३’ची कफ परेड स्थानकापर्यंत यशस्वी धाव; जुलैपर्यंत संपूर्ण मार्ग कार्यान्वित होणार

मुंबईच्या पहिल्या भुयारी मेट्रोने आज ऐतिहासिक टप्पा गाठला. ‘ॲक्वा लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मेट्रो-३’ची ट्रेन शुक्रवारी कफ परेड या अंतिम स्थानकापर्यंत यशस्वीरित्या धावली.
‘मेट्रो-३’ची कफ परेड स्थानकापर्यंत यशस्वी धाव; जुलैपर्यंत संपूर्ण मार्ग कार्यान्वित होणार
एक्स @MumbaiMetro3
Published on

मुंबई : मुंबईच्या पहिल्या भुयारी मेट्रोने आज ऐतिहासिक टप्पा गाठला. ‘ॲक्वा लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मेट्रो-३’ची ट्रेन शुक्रवारी कफ परेड या अंतिम स्थानकापर्यंत यशस्वीरित्या धावली. दरम्यान, जुलै २०२५ पर्यंत हा संपूर्ण मार्ग कार्यान्वित करण्यात येणार असून, मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे.

‘ॲक्वा लाईन’च्या एकूण ३३.५ किमी लांबीच्या मार्गातील १२.६९ किमीचा पहिला टप्पा (आरे ते बीकेसी) ७ ऑक्टोबर २०२४ पासून प्रवाशांसाठी सुरू करण्यात आला. त्यानंतर बीकेसी ते आचार्य अत्रे चौक (वरळी) हा दुसऱ्या टप्प्याचा ९.७७ किमीचा भाग वेगाने पूर्ण केला जात असून या स्थानकादरम्यान नियमित चाचण्या सुरू आहेत. हा टप्पा सात महत्त्वाच्या स्टेशनला जोडणार आहे.

आजच्या यशस्वी चाचणीमुळे १०.९९ किमी लांबीच्या आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या ‘टप्पा-२ बी’च्या उभारणीस गती मिळाली आहे. ‘ओव्हरहेड कॅटेनेरी सिस्टम’ (ओसीएस) आणि ट्रॅक बसवण्याचे काम पूर्ण झाले असून, आता उर्वरित प्रणाली म्हणजेच ‘आर्किटेक्चरल फिनिशिंग’ आणि रस्ते पुनर्बांधणीची कामे प्रगतीपथावर आहेत.

‘एमएमआरसी’च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी या यशस्वी टप्प्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी सांगितले, ‘धारावी ते आचार्य अत्रे चौक या टप्प्याच्या चाचण्या वेगाने सुरू असून आता आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या टप्प्यात देखील मेट्रो गाडी पोहोचली आहे. जुलै २०२५ पर्यंत संपूर्ण मार्ग कार्यान्वित करण्याचा आमचा निर्धार आहे.

मुंबईची वाहतूक होणार वेगवान

आजच्या यशस्वी चाचणीमुळे ‘मेट्रो-३’च्या कार्यान्वयनाला गती मिळणार आहे. ‘मेट्रो-३’ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर पश्चिम उपनगर, बीकेसी आणि दक्षिण मुंबई यांना जोडणारी जलद आणि पर्यावरणपूरक दळणवळण सुविधा उपलब्ध होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in