
मुंबई : मुंबईत पावसाला सुरुवात झाली असून साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. जून महिन्यात दररोज सरासरी २९ जणांना मलेरिया आणि ३१ जणांना गॅस्ट्रोची लागण होत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मात्र मलेरिया आणि गॅस्ट्रोच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना परिसरात स्वच्छता राखण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
मुंबईमध्ये दरवर्षी पावसाळ्यादरम्यान साथीच्या आजारांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून येते. यावेळी मुंबईकरांना मलेरिया आणि गॅस्ट्रो सारख्या संसर्गजन्य आजारांचा सामना करावा लागत आहे. तर, यंदा दूषित पाण्यामुळे आणि अन्नामुळे पोटाचे आजारही वाढत आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी जूनमध्ये ४४३ मलेरिया रुग्ण आढळले होते. तर यंदा ही संख्या दुपटीने वाढून ८८४ वर पोहोचली आहे. तसेच, गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या गेल्या वर्षीच्या ७२२ वरून यंदा ९३६ इतकी झाली आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.
दरवर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईसह राज्यात मान्सूनचे आगमन लवकर झाले. यंदा जून महिन्यात अन्य वर्षांच्या तुलनेत पावसाचे सरासरी प्रमाणही वाढले आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. राज्यातील शहरांमध्ये मात्र साथीच्या आजारांचा फैलाव यंदा तुलनेने लवकर झाला. मुंबई सारख्या शहरात यंदा जून महिन्यातच साथीच्या आजारांनी हैदोस घातला आहे. मलेरिया, गॅस्ट्रो या आजारांच्या संख्येत यंदा मोठी वाढ झाली आहे. गॅस्ट्रोच्या रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ झाली आहे. मात्र मलेरियाने यंदा धुमाकूळ घातला आहे. गत वर्षी जून महिन्यात सापडलेल्या रुग्णांच्या संख्येत यंदा दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचीही चिंता वाढली आहे. मुंबई पालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. मलेरियाच्या रुग्णसंख्येत आणखी वाढ होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे उपाययोजना केल्या जात आहेत. धुरीकरणातही वाढ करण्यात आली आहे. तसेच नागरिकांनाही परिसरात स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
डासांचे सर्वेक्षण
मलेरिया रोखण्यासाठी महापालिकेचा कीटकनाशक विभाग युद्धपातळीवर काम करत आहे. शहरभरात ७२,०९५ ठिकाणी डासांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यापैकी ६,५०६ ठिकाणी मलेरियाचे डास प्रजनन करताना आढळले असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.
अशी घ्या काळजी
पावसाळ्यात मलेरिया आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये दरवर्षी वाढ होत असते. तर यंदा डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ५ ते १० टक्के असून रुग्ण लवकर बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. यासाठी, नागरिकांनी रस्त्यावर मिळणारे अस्वच्छ अन्न आणि पाणी टाळावे. तसेच, पाणी गरम करून प्यावे. जेणेकरून, संसर्गजन्य जीवाणूपासून बचाव होईल. तसेच, मलेरियाचा संसर्ग होऊ न देण्यासाठी डास चावण्यापासून बचाव करणे, योग्य आहार घेणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. गॅस्ट्रोसाठी, हलका आणि सहज पचणारा आहार घ्यावा, भरपूर पाणी प्यावे आणि विश्रांती घ्यावी, असा सल्ला देण्यात येत आहे.