वसईतील सोनचाफ्याचा लखनऊच्या राजभवनात 'सुगंध'! राम नाईक यांनी 'नवशक्ति'शी साधला संवाद

उत्तर प्रदेशचा राज्यपाल झाल्यावर तेथे जातानाही वसईकरांनी निरोपाखातर आजच्यासारखा असाच भव्य सत्कार सोहळा आयोजित केला होता.
वसईतील सोनचाफ्याचा लखनऊच्या राजभवनात 'सुगंध'! राम नाईक यांनी 'नवशक्ति'शी साधला संवाद

अनिलराज रोकडे/वसई

उत्तर प्रदेशचा राज्यपाल झाल्यावर तेथे जातानाही वसईकरांनी निरोपाखातर आजच्यासारखा असाच भव्य सत्कार सोहळा आयोजित केला होता. तेथे गेल्यावरही वसई आणि वसईकरांचे प्रेम सतत उत्तर प्रदेशपर्यंत येत राहिले. अनेक लोक प्रेमाखातर विविध भेटी घेऊन येत. त्यात माझा आवडता वसईचा सोनचाफाही असे! वसईतून आलेली रोपे तेथे लावली होती. मध्यंतरी लखनऊच्या राजभवनात जाणे झाले. चिरपरिचित सुगंध तेथे जाणवला असता, बघितले तर वसईतून आलेली तीन रोपे आता वृक्ष होऊन सोनचाफ्याने डवरली होती, अशा अनेक भावनिक आठवणींना माजी केंद्रीय मंत्री, तथा उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी 'नवशक्ति'शी बोलताना उजाळा दिला.

राम नाईक यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल वसई-माणिकपूर येथील वाय.एम.सी.ए. सभागृहात सर्वपक्षीय आणि सर्वधर्मीय मान्यवरांतर्फे त्यांचा शनिवारी पहिलाच जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमानंतर 'वसई आणि रामभाऊ नाईक' या परस्पर स्नेहाच्या निर्माण झालेल्या समीकरणाबद्दल विचारले असता, दै. 'नवशक्ति'शी संवाद साधताना त्यांनी अनेक भावनिक आठवणींना उजाळा दिला. वसईकरांशी आपले अधिक आणि अतूट नाते असल्याचे स्पष्ट करीत ते पुढे म्हणाले की, पद्मभूषण पुरस्काराची बातमी वर्तमानपत्रात आल्यावर सर्वाधिक अभिनंदनाचे फोन वसईतूनच आले. मी सुद्धा खासदार म्हणून काम करताना पूर्वीपासूनच वसई आणि पालघरला आदिवासीबहुल आणि अर्ध ग्रामीण म्हणून झुकते माप देत आलो आहे.

१९९४ साली कॅन्सर या आजाराची झगडत असताना, त्यावेळी रोममध्ये गेलेले येथील सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस डिब्रिटो यांनी वैचारिक मतभेद बाजूला ठेवत माझ्या कामाची जाणीव ठेवून व्हॅटिकन चर्चमध्ये माझ्यासाठी प्रार्थना केली होती. त्यांच्याच मागणीवर २००० साली प्रभू येशूच्या २००० व्या जन्मदिनानिमित्त भारत सरकारला विनंती करून, येशू ख्रिस्ताचे सुंदर चित्र असलेले पोस्ट खात्याचे टपाल तिकीट वसईच्या बिशप हाऊसमध्ये मी प्रकाशित केले होते.

माझ्याच मागणीवर खासदार निधीची परंपरा सुरू

वसई विधानसभा ही माझ्या लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी एक! मी येथील खासदार होईपर्यंत भाजपचा येथे एकही खासदार किंवा आमदार नव्हता. माझ्याच मागणीवर देशात जेव्हा खासदार निधी सुरू झाला. त्यावेळी सर्व खासदारांना प्रत्येकी रुपये पाच लाख खासदार फंड मंजूर झाला. त्यावेळी संपूर्ण पाच लाखाचा खासदार निधी वसईच्या पाच तळ्यांच्या विकासासाठी वापरण्यात आला.

नाईक यांचे वसईशी भावनिक नाते

माझ्या आजारपणात आवश्यक असलेल्या ताज्या शहाळांचा अक्षरशः रतीब लावणाऱ्या यशवंत पाटलांच्या प्रेमाचे वर्णनही शब्दातीत आहे. येथील खासदारकीच्या सोळा वर्षांत, संसद अधिवेशनाचा काळ वगळता, सरासरी दर आठवड्याला एकदा मी वसईला येत राहिलो आहे, असेही नाईक यांनी बोलताना स्पष्ट केले. माणिकपूर येथील जाहीर कार्यक्रम आटोपून राम नाईक यांनी आजारी असलेले माजी आमदार डॉमिनिक घोन्सालवीस व सामाजिक कार्यकर्ते, फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करीत सदिच्छा व्यक्त केल्या. ही एक प्रासंगिक घटना सुद्धा नाईक यांच्या वसईशी असलेल्या भावनिक नात्याचा प्रत्यय देऊन गेली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in